Sun, Jul 21, 2019 10:41होमपेज › Aurangabad › आबही गेली, अन् दमडीही !

आबही गेली, अन् दमडीही !

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या 37 दिवसांपासून कचराकोंडी सोडवण्यासाठी मनपातील पदाधिकारी व अधिकार्‍यांची यंत्रणा जुंपलेली आहे. विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांसह मंत्रालयातील नगरविकास खात्यांच्या प्रधान सचिवांपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले, मात्र आजही कचरा प्रश्‍न सुटलेला नाही. यातच मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ 18 टक्क्यांपर्यंत वसुली झाली आहे. 

2017-18 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट 390 कोटींचे आहे. तसेच मागील थकबाकीच्या रकमेसह एकूण वसुलीची रक्‍कम 433 कोटींपर्यंत गेलेली आहे. मार्च 2018 पर्यंत ही रक्‍कम वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र मार्च महिना संपत आला तरी मनपाने वसुलीकडे लक्ष दिले नाही. आतापर्यंत केवळ 72 कोटी 38 लाख 66 हजार रुपये वसूल करण्यात मनपाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 18 टक्के वसुली झाली आहे. गेल्यावर्षी करापोटी 77 कोटी 19 लाख 24 हजारांची वसुली झाली होती. कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न न केल्याने गेल्या काही वर्षांपासून मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. अनेकदा कर्मचार्‍यांचे पगार रखडल्याचेही प्रकार घडले आहेत. उत्पन्नच नसल्याने विकासकामे करण्यात तसेच दुरुस्तींच्या कामांनाही ब्रेक लावावा लागत आहे. शासनाकडून मिळणारे जीएसटीच्या अनुदानाच्या रकमेतून कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर खर्च होत आहे. 

Tags : Aurangabad, Aurangabad News, Due to neglect,  property,  water tax recovery, only 18 percent, have recovered