Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Aurangabad › ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार

ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:24AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

मद्य प्राशन केलेल्या बेधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी गेट तोडून सोसायटीत घुसली. ही भरधाव कार पुढे उभ्या असलेल्या पाच-सहा दुचाकींना धडक दिल्यानंतर कार ओट्याला धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगर येथील पंचमुखी महादेव मंदिराकडून बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेधुंद मद्यप्राशन केलेले दोन तरुण कार (एमएच 20 एजी 9307) घेऊन मोरे चौकाकडे भरधाव जात होते. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार आर एक्स 5/7 सेक्टरमधील अ‍ॅरिस्टोक्रॅट हाउसिंग सोसायटीच्या प्रवेश द्वाराचे लोखंडी गेट तोडून सोसायटीत घुसली. घरासमोर उभ्या असलेल्या पाच-सहा दुचाक्यांना धडक देऊन कार पुढे ओट्याला जाऊन धडकून थांबली. ओट्याला धडकून थांबली नसती तर ही कार सोसायटीत बसलेल्या सुनीता गाडेकर, जयश्री शिगटे, मनीषा शेंडगे, निर्मला मरकड, सरला तायडे यांच्या अंगावर जाऊन मोठी दुर्घटना घडली असती. सोसायटीच्या लोखंडी गेटवर भरधाव कार धडकल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजबाजूच्या सोसायटींमध्ये राहणार्‍या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघा बेधुंद मद्यपींना कारच्या बाहेर काढत बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच फौजदार लक्ष्मण उंबरे, किशोर मुळवंडे यांनी धाव घेत कारचालक व त्याच्यासोबत असलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे बाजूच्या सोसायटीत खेळणारी मुले भयभीत झाली आहेत. वाळूज महानगरात मद्य पिऊन वसाहतीमधून धूम स्टाईल वाहने पळविणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी मद्य पिऊन वाहने चालविणार्‍या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी सुरेखा शिंदे, मीना वावरगिरे, कडूबाई गाडेकर, रंजना पवार, द्वारका गाडेकर, सुलभा गरड आदींनी केली आहे.