औरंगाबाद : प्रतिनिधी
काम करत असताना विहिरीत तोल जाऊन पडलेल्या शेतकर्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. सूर्यभान माधवराव कचकुरे (58, रा. शेंद्रा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यभान कचकुरे हे शेतातच राहतात. त्यांचे बीड बायपासवरील सहारा सिटी भागात शेत आहे. दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त ते शेतात गेले होते. विहिरीजवळ काम सुरू असताना तोल जाऊन ते विहिरीत पडले. यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कचकुरे यांना घरी काहीही न सांगता बाहेर जाण्याची सवय होती. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला नाही. तसेच बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांनाही कळविले नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर हा प्रकार एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घाटीत दाखल केला. सूर्यभान यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस नाईक घुगरे करीत आहेत.