Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Aurangabad › तलावात बुडून सख्या भावांचा मृत्यू 

तलावात बुडून सख्या भावांचा मृत्यू 

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:49AM

बुकमार्क करा

पाचोड : प्रतिनिधी 

घरातून बेपत्‍ता झालेल्या दोन सख्ख्या भावांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे मंगळवारी रात्री 8 वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

हरी उर्फ रितेश दत्ता घोडके (7) आणि विशाल (9 रा. लिंबगाव) अशी मृतांची नावे आहेत. हरी हा इयत्‍ता पहिल्या तर विशाल हा तिसर्‍या वर्गात शिक्षण घेत होता. 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारापासून हे दोघे भाऊ घरातून बेपत्ता झाले होते. बराच वेळ वाट बघितल्यानंतर ते घरी न आल्याने आई वडिलांनी गावासह परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु शोध काही लागला नाही. दरम्यान, गावाजवळील पाझर तलावात एका मुलाचा मृतदेह पाण्याच्या वर तरंगताना गावकर्‍यांना आढळून आला. या घटनेची माहिती गावासह परिसरात वार्‍यासह पसरताच नागरिकांनी या तलावावर मोठी गर्दी केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी काही तरूणांची मदत घेवून तलावून दोन्ही मुलांना बाहेर काढले.

यातील एक मुलगा गाळात फसला होता. रात्री 9 वाजता या दोन्ही मुलाचे मृतदेह तलावाबाहेर काढून उत्‍तरीय तपाणीसाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात  नोंद करण्याची प्रक्रिया रात्री  उशिरापर्यंत चालू होती.