Mon, Apr 22, 2019 16:36होमपेज › Aurangabad › दारू पाजून केला मित्राचा खून; तीन महिन्यांनंतर फुटली वाचा

दारू पाजून केला मित्राचा खून; तीन महिन्यांनंतर फुटली वाचा

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:42AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

तीन महिन्यांपूर्वी चिकलठाण्यातील सुखना नदीच्या पुरात मृतावस्थेत आढळलेल्या कृष्णा एकनाथ कोरडे (22, रा. चिकलठाणा) याचा खून झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वहिनीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरून त्याच्या मित्रानेच मित्रांच्या मदतीने दारू पाजून डोक्यात कोयता, कुर्‍हाडीचे घाव घालून ही हत्या केली. त्यानंतर दुचाकीसह त्याला सुखना नदीच्या पुरात फेकून दिले, असे तपासात समोर आल्यावर गुन्हे शाखेने चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

या प्रकरणी आरोपी नारायण रतन गरंडवाल (25), समाधान गणेश कालभिले (23), राजू तुळशीराम पवार (22) आणि सुनील रमेश घोगरे (21, सर्व रा. जुना बीड नाका, चिकलठाणा) या चौघांना सोमवारी (दि. 18) अटक करण्यात आली. आरोपी हे एकाच ठिकाणी मजुरीवर दरवाजे बनविण्याचे काम करतात.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर थोरात यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी चिकलठाण्यात सुखना नदीच्या पुरात वाहिलेली एक दुचाकी आढळून आली होती. दुचाकी सापडल्यानंतर शोध मोहिमेत कृष्णा कोरडेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता. पुरात दुचाकी वाहून कृष्णाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्‍त करून या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याच पद्धतीने तपास करून विषय बंद केला होता. मृत कृष्णा कोरडेचा भाऊ संजय कोरडे याने 30 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्याकडे अर्ज केला. त्यात कृष्णाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच या प्रकरणाला खरी कलाटणी मिळाली.

पीएम रिपोर्टनंतर पोलिस लागले कामाला...

मृत कृष्णाचा भाऊ संजय याने संशय व्यक्‍त केल्यानंतर पोलिसांनी कृष्णाचा उत्तरीय तपासणी अहवाल मागवला. त्यात कृष्णाच्या डोक्यात खोलवर घाव घातल्याचे समोर आले. त्यानंतर शिवाजी कांबळे यांनी एक पथक तपासकामी नेमले. उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक नसीम पठाण, पोलिस नाईक विजयानंद गवळी, समद पठाण, प्रदीप शिंदे, संदीप बीडकर, भाऊलाल चव्हाण, रितेश जाधव, रमेश भालेराव यांच्या पथकाने कृष्णा कोरडे याच्या मृत्यूची चौकशी सुरू केल्यावर तब्बल दीड महिन्यात गोपनीय माहिती मिळविली. त्याचा मित्र नारायण गरंडवाल याच्याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर कॉल डिटेल्स तपासले. इतर मित्रांचाही सहभाग समोर आल्यावर पोलिसांचा संशय बळावला.

...अन् आरोपी म्हणाला ‘चूक झाली साहेब’

आरोपी नारायण गरंडवाल याच्यावर पूर्णपणे संशय बळावल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली. मात्र, तो तोंड उघडत नव्हता. अधिक विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यावर नारायण गरंडवाल याने ‘चूक झाली साहेब’ म्हणून कबुली दिली. त्यानंतर पोपटासारखा बोलत त्याने सर्व कहाणी सांगितली. 

असा केला खून

मृत कृष्णा कोरडे आणि आरोपी नारायण गरंडवाल, समाधान कालभिले, राजू पवार व सुनील घोगरे हे एकमेकांचे मित्र आहेत. कृष्णाची वहिनीवर वाईट नजर आहे, असा संशय नारायणला होता. त्यामुळे त्याने कृष्णाला समजावून सांगितले होते, परंतु तो काही ऐकत नव्हता. त्यामुळे नारायणने कृष्णाच्या खुनाचा प्लॅन आखला. आपल्या तीन मित्रांना पार्टीचे आश्‍वासन देऊन त्याने 14 सप्टेंबरच्या रात्री कृष्णाला चिकलठाण्यात एका हॉटेलवर दारू पाजली. त्यानंतर घरी जाताना कृष्णासोबत वाद उकरून काढला. त्याच वेळी इतर तिघे तेथे आले. त्यांनी सर्वांनी मिळून कृष्णाचा खून केला. त्यानंतर मृतदेह आणि दुचाकी सुखना नदीच्या पुरात फेकून दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.