Fri, Mar 22, 2019 08:23होमपेज › Aurangabad › लोकसभेसाठी डॉ. काळेंना जालन्याची वाट

लोकसभेसाठी डॉ. काळेंना जालन्याची वाट

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 12:45AMऔरंगाबाद : रवी माताडे

मी फुलंब्रीतच बरा... असे म्हणणार्‍या डॉ. कल्याण काळे यांना जालना लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्याचे संकेत देत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात आलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत झालेल्या चर्चेत चव्हाण यांनीच काळेंचे नाव सुचवल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे डॉ. काळे हेच जालन्यातून काँग्रेसचे उमदेवार राहतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ नेेत्यांच्या बैठकांतही उमेदवारांबाबत चर्चा होऊ लागली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे एका कार्यक्रमासाठी शनिवारी शहरात आले होते. रविवारी ते जालना जिल्ह्यातील बदनापूरला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. 

बदनापूरच्या कार्यक्रमात आझाद यांनी जालना लोकसभा निवडणुकीचा विषय छेडला. 2014 मध्ये विलास औताडे हे आपले उमेदवार होते, त्यांना फार कमी मते मिळाली, तर 2009 मध्ये डॉ. कल्याण काळे यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. डॉ. काळे यांचा पराभव खूपच कमी फरकाने झाला, 7-8 हजार मते कमी पडली, अन्यथा ते विजयी झाले असते, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी गुलाम नबी आझाद यांना दिली. तर यावेळी जालन्यातून आपला उमेदवार 1 लाख मतांनी जिंकून येईल, असा सत्तार यांनी दावा केला. हे ऐकताच, ‘जालना से आप लढ रहे हो क्या’, असा प्रतिप्रश्‍न आझाद यांनी करताच सत्तार यांनी हा चेंडू डॉ. काळेंच्या दिशेने टोलवला. उमेदवारी देताना 2009 ची पुनरावृत्ती 2019 मध्ये होईल, यावेळी आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येईल, असे स्थानिक नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. 

Tags : Aurangabad, Dr, Kale, Congress, candidate, Jalna