औरंगाबाद : प्रतिनिधी
वर्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या मुलाच्या नावे असलेला चिकलठाणा एमआयडीसीतील प्लॉट बळकावल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. भाडेतत्त्वावर दिलेला प्लॉट बनावट कागदपत्रे तयार करून पाच कोटींची फसवणूक केल्याचे नितीन देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वर्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा मुलगा नितीन देशपांडे (रा. वर्हाड, भाग्यनगर, औरंगाबाद) यांच्या नावे चिकलठाणा एमआयडीसीत प्लॉट आहे. त्यावर 20 हजार स्वेअरफूट शेड उभारलेले असून प्लॉटची किंमत सुमारे 5 कोटी आहे. त्यांनी तो प्लॉट 2007 मध्ये गोविंद शिवाजीराव गिते (रा. परळी) याला 3 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला होता. 2010 मध्ये गिते याने तो प्लॉट रिकामा करून देणे अपेक्षित होते. मात्र, गिते याने वेगवेगळी कारणे देऊन प्लॉट रिकामा करणे टाळले.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी नितीन देशपांडे हे या प्लॉटवर गेले असता गिते म्हणाला की, ‘हा प्लॉट मी तुमच्याकडून विकत घेतला आहे, मला उगाच त्रास देऊ नका प्लॉटचा मीच मालक आहे’ असे सांगून त्याने नितीन देशपांडे यांच्या सह्या असलेली कागदपत्रे दाखवली. यावर धक्का बसलेल्या नितीन देशपांडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे दार ठोठावले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाची चौकशी केली.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस आयुक्त यशस्वी यादव, मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) रामेश्वर थोरात, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरुण वाघ करीत आहेत.