होमपेज › Aurangabad › डॉ. दाभोलकरांच्या शूटरसह दोघांना अटक

डॉ. दाभोलकरांच्या शूटरसह दोघांना अटक

Published On: Aug 19 2018 1:47AM | Last Updated: Aug 19 2018 1:46AMदाभोलकरांच्या हत्येची सचिनने दिली कबुली
अटकेनंतर सचिन अणदुरेची मुंबई एटीएसने कसून चौकशी केली. स्फोटकांच्या कटात तो सहभागी असल्याचे त्याने कबूल केलेच, याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचीही धक्‍कादायक कबुली त्याने दिली. हिंदू धर्माच्या रूढी-परंपरांविरोधात डॉ. दाभोलकर हे बोलत असत. त्यामुळे आम्ही त्यांना संपविण्याचा निर्णय घेतला. आम्ही रेकी केली. 20 ऑगस्ट रोजी एका साथीदारासह पुण्यात दुचाकी घेऊन दाभोलकरांचा पाठलाग करीत निघालो. ते मॉर्निंग वॉकला जात होते. संधी मिळताच त्यांच्यावर आम्ही गोळ्या झाडल्या. त्यांची हत्या केली आणि तेथून पुन्हा दुचाकीवर बसून पसार झालो, अशी कबुली सचिन अणदुरेने दिल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. हत्येच्या वेळी त्याच्यासोबत असलेला साथीदारालाही एटीएसने अटक केली आहे. त्या साथीदारानेही या हत्येची कबुली दिली आहे.

औरंगाबाद : प्रतिनिधी

देशभर गाजलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात अखेर एटीएसला यश आले. धक्‍कादायक बाब म्हणजे नालासोपारा स्फोटकेप्रकरणी मुंबई एटीएसने मंगळवारी (दि. 14 ऑगस्ट) औरंगाबादेतून अटक केलेला सचिन अणदुरे (35, रा. कुंवारफल्ली, राजाबाजार) हाच दाभोलकर यांचा मारेकरी निघाला. त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

सचिननेच 20 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या अन्य एका साथीदाराच्या सोबतीने पुण्यात सकाळी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी चालवून त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. नालासोपारा स्फोटकांच्या तपासादरम्यान त्याने आपणच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी धक्‍कादायक कबुली दिली. त्यानंतर एटीएसने सचिनला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) स्वाधीन केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हे 20 ऑगस्ट रोजी मॉर्निंग वॉकला चालले होते. अचानक मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. ते खाली पडताच दोन्ही हल्लेखोर मोटारसायकलवर निघून गेले. या हल्ल्यात दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्येने अख्खा महाराष्ट्र सुन्‍न झाला होता. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्यभरातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. विविध एजन्सींनी विविध मार्गांनी तपास केला. परंतु, काहीही धागेदोरे हाती लागत नव्हते. या प्रकरणाच्या तपासासाठी आधी राज्य शासनाने एक विशेष पथक तयार केले. नंतर सीआयडीकडे तपास सोपविण्यात आला. आता हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आलेला आहे.

मुंबईतील स्फोटके प्रकरणाच्या तपासात सापडले धागेदोरे

सनातन संस्थेशी संबंधित असलेले काही कार्यकर्ते महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये भीषण घातपात घडविण्याच्या तयारीत असून, त्यांनी त्यासाठी स्फोटकांची जमवाजमव केली आहे, अशी माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. त्या माहितीवरून तपास करून 9 व 10 ऑगस्ट रोजी एटीएसने मुंबईतील नालासोपारा भागात वैभव राऊत या सनातनच्या कार्यकर्त्याच्या घरावर छापा मारला. त्यात 20 गावठी बॉम्बसह बॉम्ब बनविण्यासाठी लागणारा स्फोटकांचा मोठा साठा एटीएसच्या हाती लागला होता. याच प्रकरणात वैभवच्या अन्य दोन साथीदारांना त्याचवेळी ताब्यात घेण्यात आले होते. नालासोपारा येथून ताब्यात घेतलेला अन्य एक आरोपी शरद कळसकर (25) हाही औरंगाबादच्या दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केसापुरीचा रहिवाशी होता. तोही या कटात सहभागी होता. आरोपी शरद कळसकरच्या चौकशीत त्यांच्यासोबत औरंगाबादेतील रहिवाशी असलेला सचिन अणदुरे हाही या स्फोटकांच्या कटात सहभागी असल्याची माहिती समोर आली. 

औरंगाबादेत सचिनला अटक

नालासोपारा स्फोटकांच्या तपासात सचिन अणदुरेचे नाव समोर येताच, मुंबई एटीएसचे पथक 14 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत दाखल झाले. या पथकाने निराला बाजार भागात छापा मारून सचिन अणदुरेला उचलले. त्याच रात्री त्याला अटक करून मुंबईला तपासासाठी नेण्यात आले होते.

सीबीआयच्या स्वाधीन केले

सचिन अणदुरे याने दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिल्यानंतर मुंबई एटीएसने त्याला व त्याच्या साथीदाराला सीबीआयच्या स्वाधीन केले आहे. दाभोलकर हत्याकांडाचा तपास सध्या सीबीआय करीत आहे. त्यामुळे त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोण आहे अणदुरे?

आरोपी सचिन अणदुरे हा औरंगाबादेत सध्या पत्नी आणि आपल्या एक वर्षीय मुलीसह कुंवारफल्ली भागात भाड्याच्या खोलीत रहात होता. मागील सहा महिन्यांपूर्वीत तो या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आलेला होता. तो औरंगाबादचा रहिवाशी आहे. गुजराती हायस्कूलमध्ये त्याने आपले शालेय शिक्षण आणि स. भु. महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. तो निराला बाजार भागातील एका कापड दुकानावर सेल्समन म्हणून आठ हजार रुपये वेतनावर गेल्या काही दिवसांपासून नोकरी करीत होता. त्याचे आई-वडील हयात नाहीत. त्याला एक मोठा भाऊ आहे. तो कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. तो आपल्या फेसबुक पेजवर सतत अत्यंत भडक अशा पोस्ट करीत असे. स्फोटक प्रकरणातील दुसरा आरोपी शरद कळसकर आणि सचिन अणदुरे यांची चांगलीच मैत्री होती.

जालन्यातून माजी नगरसेवक ताब्यात

जालना : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी मुंबई एटीएसने एका माजी नगरसेवकाला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. शनिवारी दिवसभर एटीएसने जालन्यात येऊन या माजी नगरसेवकाच्या घराची झडती घेतल्याचे समजते. ताब्यात घेण्यात आलेला माजी नगरसेवक हा हिंदू जनजागरण समितीचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

अणदुरेची चौकशी

दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयनेही, अणदुरेला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. अणदुरे याला रविवारी पुण्यातील सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी आणखी दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने या तिन्ही हत्याकांडाचे धागेदोरे उघडकीस आणण्यात एटीएसला पुरेसा अवधी मिळाला आहे.

पाच वर्षांनी उकल

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. दाभोलकर यांच्यावर पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर पुलावर अडवत मोटारसायकवरून आलेल्या दोघांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यात डॉ. दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी घडलेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. स्थानिक पोलिसांसह राज्यातील आणि केंद्रातील सर्व तपास यंत्रणा या हत्याकांडाची उकल करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, गेली पाच वर्षे कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते. अखेर शनिवारी या हत्याकांडाची उकल करण्यात एटीएसला यश आले.