Wed, Jan 23, 2019 03:20होमपेज › Aurangabad › दोन लाख हेक्टरवर ‘दुबार’ संकट

दोन लाख हेक्टरवर ‘दुबार’ संकट

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 04 2018 12:32AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महिनाभर उशिरा का होईना आलेल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी लागवडीची लगबग केली. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरणी झालेल्या दोन लाख 31 हजार 658 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. विशेष म्हणजे जुलै सुरू झाला तरी अपेक्षित पावसाने हजेरी लावली नसल्याने खरीपच धोक्यात आले आहे.

पंधरवड्यापूर्वी पावसाने औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यांसह जिल्ह्यात काही भागात दमदार हजेरी लावली. त्यामुळे लागवडीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी समाधान व्यक्‍त केले. जिल्ह्यातील एकूण लागवडी खालील आठ लाख हेक्टरपैकी पंचवीस टक्के म्हणजे दोन लाख 31 हजार 658 हेक्टरवर पेरणी केली. यात एक लाख 40 हजार हेक्टरवर कपाशी, तर त्या खालोखाल 64 हजार 369 हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय तूर 7 हजार 846 हेक्टर, सोयाबीन 5 हजार 489 हेक्टर, उडीद 2 हजार 223, बाजरी 5 हजार 498, भुईमूग एक हजार 312, इतर तृणधान्य 263, ज्वारी 402 हेक्टर क्षेत्रावर पेण्यात आलेली आहे. आधीच अल्प पावसावर ही लागवड करण्यात आलेली असताना आठवड्याभरापासून पाऊसच आलेला नाही. त्यामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 75 टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरणी झाली नाही. विशेष म्हणजे 75 क्षेत्रावरील पेरणी अद्यापही प्रलंबित आहे. पाऊस लांबल्यास खरीप हंगामच धोक्यात येण्याची भीती शेतकर्‍यांना सतावत असून त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.