Thu, Apr 25, 2019 21:35होमपेज › Aurangabad › कुत्रेही आवरेनात अन् लसही देईना !

कुत्रेही आवरेनात अन् लसही देईना !

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:36AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या कृपेने शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. मनपाच्या कृपेने पोसलेल्या या कुत्र्यांनी जर तुम्हाला चावा घेतला अन् उपचारासाठी तुम्ही मनपा दवाखान्यात गेलात तर तेथे तुम्हाला रेबीजची लस उपलब्ध असूनही मिळेल याची शाश्‍वती नाही. कारण मनपा दवाखान्यात स्टॉकमध्ये असलेली ही लस केवळ मनपा अधिकारी आणि पदाधिकार्‍यांसाठी राखीव आहे, नागरिकांसाठी नाही, अशी धक्‍कादायक माहिती सोमवारी मनपाच्या एन-8 येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. हेच कारण सांगत त्यांनी रुग्णाला मोफत लस नाकारत बाहेर काढून दिले.

या घटनेवरून ‘निष्काम जन सेवाये समर्पिता’ हे बिरुद लावून मिरणारी महानगरपालिकेची सेवा प्रत्यक्षात जन सेवाये समर्पिता नसून केवळ ‘पदाधिकारी तथा अधिकारी सेवाये समर्पिता’ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

त्याचे झाले असे की, पुंडलिकनगर परिसरातील गुरुदत्तनगरातील रहिवासी भाजीविक्रेते संतोष गायकवाड यांचा 13 वर्षीय मुलगा पवन याला 1 मे रोजी परिसरातील मोकाट कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याच्या चाव्याने होणारा रेबीजचा आजार हा प्रचंड धोकादायक असतो. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर गायकवाड यांनी आपल्या मुलाला 2 मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे रेबीजची लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे घाटीने मुलाला मनपाच्या आरोग्य केंद्रात ही लस असून तेथे घेऊन जा, असे गायकवाड यांना सांगितले. वास्तविक पाहता शहरवासीयांना मोफत आरोग्य सेवा पुरवणे याची पहिली जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे. 

स्टॉक नाही सांगून विकत आणायला लावली लस

संतोष गायकवाड हे घाटीत रेबीज लस उपलब्ध नसल्याने आपल्या मुलाला 3 मे रोजी मनपाच्या एन-8 येथील आरोग्य केंद्रात घेऊन आले. त्यावेळी तेथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी गायकवाड यांना आमच्याकडे रेबीज लसचा स्टॉक नाही, तुम्ही बाहेरच्या मेडिकलमधून ती विकत घेऊन या, असे सांगितले. गायकवाड यांनी तातडीने बाहेर मेडिकलमध्ये जाऊन ती लस खरेदी करून आणली. त्यानंतर ती लस मुलाला देण्यात आली. पुन्हा लस देण्यासाठी सोमवारी (दि. 7) त्यांना बोलाविण्यात आले.

लस असतानाही देण्यास नकार

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गायकवाड हे सोमवारी मुलाला घेऊन सकाळी एन-8 च्या आरोग्य केंद्रात आले. दरम्यान, ‘मनपाच्या दवाखान्यात मोफत उपचार आणि औषधी असतात, तुम्ही बाहेरून औषधी आणू नका, त्यांच्याकडे मागणी करा’ असे गायकवाड यांना वॉर्डातील नगरसेवकाने सांगितले. त्यामुळे दवाखान्यात गेल्यानंतर गायकवाड यांनी मी बाहेरून लस आणणार नाही, तुमच्याकडे स्टॉक आहे, त्यातून लस द्या, असे तेथील डॉक्टर व कर्मचार्‍यांना म्हटले. त्यावर डॉक्टरांनी ‘अहो, लसीचा तो स्टॉक तुमच्यासारख्यांसाठी नाही. तो स्टॉक केवळ मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी आम्ही राखीव ठेवला आहे. अचानक त्यांना गरज पडली तर कोठून आणायचा. आमच्याकडे तुमच्यासाठीचा स्टॉक आणखी आलेला नाही. आठ-दहा दिवसांनी तो येईल’ असे सांगत चक्‍क डॉक्टरांनी लस उपलब्ध असतानाही ती दिली नाही. 

नगरसेवकांनाही जुमानले नाही

विशेष म्हणजे गायकवाड यांनी डॉक्टरांनी स्टॉकमधील मोफतची लस देण्यास नकार देताच परिसरातील तीन नगरसेवकांशी संपर्क साधून डॉक्टरशी बोलणे करून दिले; परंतु नगरसेवकांनाही त्यांनी जुमानले नाही. अखेर गायकवाड यांनी पुन्हा बाहेरून ती लस खरेदी करून आणली, तेव्हा डॉक्टरांनी त्या मुलाला ती दिली.