Fri, Jul 19, 2019 20:40होमपेज › Aurangabad › जिल्हा बँकेला कर्मचार्‍यानेच लावला लाखोंचा चुना

जिल्हा बँकेला कर्मचार्‍यानेच लावला लाखोंचा चुना

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 1:37AM

बुकमार्क करा
फुलंब्री : प्रतिनिधी

तालुक्यातील बाबरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍याने बँकेचे 45 लाख रुपये इतरांच्या खात्यावर वळते करून अपहार केला. या कर्मचार्‍याविरोधात वडोदबाजार पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडीच वर्ष बँकेने अंतर्गत चौकशी केल्यानंतर बँकेने कर्मचार्‍याच्याविरोधात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासाहेब भाऊसाहेब काळे (रा.मांडवा ता. गंगापूर) असे गुन्हा दाखल बँक कर्मचार्‍याचे नाव आहे. काळे हे बाबरा शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी एक एप्रिल 2015 ते 31 ऑक्टोबर 2015 या कालावधीत बँकेतील कर्मचार्‍यांचे गोपनीय पासवर्ड मिळवून बँके खात्यातील रक्‍कम इतरांच्या खात्यावर वळती केली. संबंधित खातेदारांच्या बनावट सह्या करून तब्बल 45 लाख रुपयांचा अपहार केला.

पैशाचा अपहार करणार्‍या कर्मचार्‍याचा भांडाफोड झाल्यानंतर बँकेने अंतर्गत चौकशी सुरू केली. या चौकशीसाठी बँक अधिकार्‍यांना तब्बल अडीच वर्ष लागली. जिल्हा बँकेचे फुलंब्री तालुका अधिकारी रवींद्र दत्तात्रय हिरे यांनी वडोदबाजार पोलिसात, काळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील व पोलिस उपनिरीक्षक नारायण घुगे करीत आहेत.