औरंगाबाद : प्रतिनिधी
कुरियर मालकाने कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एकाने पाळत ठेवून त्यांची दोन लाख रुपयांची बॅग लंपास केली होती. या घटनेचा उलगडा गुन्हे शाखेने केला असून सीसीटीव्ही फुटेजवरून अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख 94 हजार 300 रुपये जप्त केले आहेत. 6 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.
उमेश रमेश गाडेकर (22, रा. गल्ली क्र. 7, पुंडलिकनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी उमेश गाडेकर हा अपना बाजार भागातील क्विक कुरियर सर्व्हिसमध्ये कामाला होता. जवळपास अडीच ते तीन वर्षे काम केल्यानंतर कुरियर सर्व्हिसच्या मालकाने सहा महिन्यांपूर्वी त्याला कामावरून कमी केले. त्यामुळे उमेशला कुरियर सर्व्हिस मालकाचा राग आला होता. दरम्यान, त्याने वाळूज येथील एका कुरियर सर्व्हिसमध्ये काम सुरू केले, परंतु क्विक कुरियर सर्व्हिसच्या मालकाचे काही तरी नुकसान करण्याचे त्याच्या डोक्यात सतत सुरू होते.
दरम्यान, क्विक कुरियरमध्ये कामाला असलेले लंकेश भरत परदेशी (40, रा. नारळीबाग) हेरोज जमा झालेले पैसे मालकाला नेऊन देत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार, 5 मे रोजी रात्री परदेशी पैसे घेऊन जाणार असल्याचे हेरून त्याने परदेशी यांच्यावर पाळत ठेवली. परदेशी यांनी जमा झालेले दोन लाख रुपये मालकाला नेऊन देण्यासाठी जेवणाच्या डब्याच्या बॅगमध्ये ठेवले. कुरियर दुकानाचे शटर लावत असताना परदेशी यांनी पैसे, डबा असलेली बॅग बाजूला ठेवली. ते शटर लावत असताना आरोपी उमेश गाडेकरने पैसे आणि डबा असलेली बॅग घेऊन धूम ठोकली.
24 तासांत ठोकल्या बेड्या
घटना घडल्यानंतर परदेशी यांनी तत्काळ कुरियर सर्व्हिसच्या मालकाला माहिती दिली. त्यांनी लगेचच जवाहरनगर पोलिसांना घटना कळविली. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी गुन्हे शाखेला याबाबत माहिती देऊन आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्या पथकाला कामाला लावले. त्यांनी कुरियर दुकानातील सीसीटीव्ही तपासले, परंतु ते बंद असल्यामुळे काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर समोरच्या दुकानाचे सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी पळताना दिसला. हे फुटेज फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन तपासले. तेथे आरोपीची ओळख पटली. त्यानंतर त्याचा घरी जाऊन शोध घेतला असता तो पसार असल्याचे लक्षात आले. पुढे सहायक उपनिरीक्षक भंडारे यांच्या पथकाने सापळा रचून गजानन नगरातील पहाडे कॉर्नरजवळ आरोपी उमेश गाडेकरला अटक केली.