Thu, Apr 25, 2019 13:35होमपेज › Aurangabad › मिटमिटा दंगलीची थातूर ‘माथूर’ चौकशी

मिटमिटा दंगलीची थातूर ‘माथूर’ चौकशी

Published On: Jun 29 2018 1:03AM | Last Updated: Jun 29 2018 12:58AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी पोलिस महासंचालक सतीश माथूर मिटमिटा दंगलीच्या चौकशीसाठी औरंगाबादेत आले. त्यातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे अपेक्षित असताना महासंचालकांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात एसीत बसूनच पीडितांची आपबीती ऐकून घेतली. विशेष म्हणजे, आलेल्या अर्ध्या नागरिकांची चौकशी झाल्यानंतर मध्येच त्यांनी चवदार पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर मार खाणार्‍या सर्वसामान्यांची त्यांना आठवण झाली. सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी असताना त्यांनी मिटमिटावासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देत औरंगाबादचा निरोप घेतला.

कचरा प्रश्‍नावरून मिटमिट्यात 7 मार्च रोजी दंगल उसळली होती. कचरा घेऊन जाणार्‍या महापालिकेच्या वाहनांवर नागरिकांनी दगडफेक करीत जाळपोळ केली होती. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव शहरात असताना त्या भागाकडे फिरकलेही नव्हते. त्याच रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून महिला, मुले आणि नागरिकांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती. घरांवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान केले होते. पोलिसांची या भागात दहशत निर्माण झाली होती. पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानेच हा लाठीचार्ज झाल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी यशस्वी यादव यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविले होते. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि गृहसचिव हे मिटमिट्यात जाऊन चौकशी करतील, अशीही घोषणा केली होती. तत्पूर्वी पोलिस उपायुक्‍त (मुख्यालय) डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्था सतत बिघडत असल्याने ही चौकशी रखडली होती. त्यामुळे पोलिस महासंचालक सतीश माथूर हे स्वतः चौकशी करण्यासाठी आले होते.

अशी केली चौकशी

दंगलीच्या चौकशीसाठी प्रशासनातर्फे मिटमिटावासीय, जखमी पोलिस, दंगेखोर पोलिस, कचर्‍याच्या गाड्यांवरील चालक, घाटीतील डॉक्टर आदींना बुधवारी पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या कार्यालयात बोलावले होते. प्रत्यक्षात महासंचालकांनी मिटमिटा येथे जाऊन चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. दरम्यान, स्नेहमिलनाचा कार्यक्रम आटोपून महासंचालक माथूर यांनी प्रथम मिटमिटा गावकर्‍यांची बाजू जाणून घेतली. तेव्हा बाराशे लोकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, तोडफोड झालेली वाहने व घरातील साहित्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

त्यावर माथूर यांनी गावकर्‍यांना एक निवेदन तयार करून देण्यास सांगितले. तसेच तुमच्या दोन्ही मागण्या या गृहमंत्रालयाकडे पाठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मिटमिट्याचे नगरसेवक रावसाहेब आम्ले, अ‍ॅड. अशोक मुळे, अजबराव मुळे, शिवाजी गायकवाड, हिरालाल वाणी, आर. बी. चव्हाण, विश्‍वनाथ चव्हाण, अण्णासाहेब वाकळे, दौलत चेचोड यांच्यासह महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.