Thu, Apr 25, 2019 05:38होमपेज › Aurangabad › विमानातच साधला शहरवासीयांशी संवाद

विमानातच साधला शहरवासीयांशी संवाद

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:28AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेचे नवे आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पदभार घेतला. मात्र, त्यांनी पदभार घेण्याआधीच आपल्या कामाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेल्या विनायक यांनी विमानामध्येच सहप्रवासी औरंगाबादकरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तासाभराच्या प्रवासात त्यांनी औरंगाबादकर प्रवाशांंना आपली ओळख करून दिली. तसेच त्यांना चिठ्ठ्या वाटून त्यावर त्यांच्या अपेक्षा लिहून घेतल्या. नव्या आयुक्‍तांच्या या अशा सकारात्मक प्रतिसादामुळे औरंगाबाद प्रवाशांना सुखद धक्‍का बसला. 

कचराप्रश्‍न हाताळण्यात अपयशी ठरलेल्यामुळे राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांची इतरत्र बदली केली. तेव्हापासून हा पदभार जिल्हाधिकार्‍यांकडे होता. तब्बल दोन महिन्यांनंतर आता मनपाला नवे आयुक्‍त मिळाले आहेत. नवे आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत येऊन पदभार स्वीकारला, परंतु त्याआधी मुंबईहून औरंगाबादकडे निघताच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. विनायक हे मुंबईहून औरंगाबादकडे विमानाने निघाले होते.

विमानात बसताच ते जागेवर उभे राहिले. त्यांनी विमानात कोणकोण औरंगाबादकर आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर त्यांनी मी तुमच्या शहराचा नवीन मनपा  आयुक्‍त आहे, अशा शब्दांत स्वतःची ओळख करून दिली. तसेच त्यांनी स्वतःकडे असलेल्या कोर्‍या चिठ्ठया प्रत्येक औरंगाबादकर प्रवाशाकडे देऊन त्यांना मनपाकडून असलेल्या अपेक्षा लिहून देण्याची विनंती केली. मनपा आयुक्‍तांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे या प्रवाशांना सुखद धक्‍का बसला. प्रवाशांनीही मग तातडीने आपल्या अपेक्षा लिहून दिल्या. जवळपास तीस जणांनी नव्या आयुक्‍तांकडे त्यांच्या अपेक्षा आणि सूचना लिहून दिल्या. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन, असे आश्‍वासनहीविनायकयांनी दिले. .