Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Aurangabad › उपायुक्‍त रवींद्र निकम सस्पेंड

उपायुक्‍त रवींद्र निकम सस्पेंड

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 1:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जयभवानीनगर येथील नाल्यात बुडून एका मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी मनपातील उपायुक्‍त रवींद्र निकम यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या काही तासांतच निकम यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

जयभवानीनगरातील नाल्याचा विषय दोन वर्षांपासून गाजत आहे. नाल्यावर घरे बांधली गेल्यामुळे गतवर्षी या ठिकाणी शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर मनपाने सहा महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यात तिथे अतिक्रमण हटाव कारवाई राबविली. सुमारे सव्वाशे घरे पाडली. तरीदेखील नाल्यातील दोन-तीन मालमत्ता तशाच सोडण्यात आल्या होत्या. मागील सभेत जयभवानीनगर वॉर्डाच्या नगरसेविका मनीषा मुंढे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत हा नाला तातडीने मोकळा न केल्यास पावसाळ्यात दुर्घटना घडू शकेल, अशी भीती व्यक्‍त केली होती. त्यानंतर मनपा आयुक्‍त विनायक यांनी 11 जून रोजी उपायुक्‍त रवींद्र निकम यांना या नाल्यातील राहिलेल्या मालमत्ता पाडण्याचे आदेश दिले होते, परंतु निकम यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर आठवडाभरातच या ठिकाणी भगवान मोरे या मजुराचा नाल्यात बुडून मृत्यू झाला.

निलंबनाची कारवाई तिसर्‍यांदा

रवींद्र निकम यांच्यावर याआधीही दोन वेळा निलंबनाची कारवाई झालेली आहे. 2010 साली वॉर्ड अधिकारी असताना कर वसुली कमी झाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2010 साली उपायुक्‍त बनल्यावर राष्ट्रध्वज उलटा फडकल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गतवर्षी अग्‍निशमन दलाच्या अंबर दिव्याच्या गाडीचा बेकायदेशीररीत्या वापर केल्याप्रकरणी त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी चौकशी केलेल्या नोकर भरतीच्या प्रकरणातही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. 

आणखी तिघांवर कारवाईची कुर्‍हाड

आयुक्‍त विनायक यांनी बुधवारी उपायुक्‍त निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, परंतु या प्रकरणात आणखी काही जणांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. आयुक्‍तांनी नाल्याचे हे प्रकरण आठवडाभरापूर्वीच निकम यांच्याकडे सोपविले होते. त्याआधी तब्बल दोन वर्षांपासून हा विषय गाजत होता. अतिक्रमण विभागाने सहा महिन्यांपूर्वी तिथे कारवाई सुरू केली होती, परंतु सव्वाशे मालमत्ता पाडल्यानंतरही केवळ दोन मालमत्ता पाडण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिरंगाई केली. तसेच तिथे सव्वा कोटी रुपये खर्चून नाला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यातही ठेकेदार आणि मनपातील कार्यकारी अभियंत्यांकडून विलंब झाला आहे. याशिवाय नाल्याच्या मार्किंगमध्येही नगररचना विभागाकडून चुका झाल्याचा आरोप होतो आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.