होमपेज › Aurangabad › दिल्ली दरवाजाचे दगड कोसळले

दिल्ली दरवाजाचे दगड कोसळले

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 1:56AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजाचे अनेक दगड बुधवारी कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. दौलताबाद पोलिस, छावणी वाहतूक शाखा, अग्‍निशमनदल यांनी वेळीच दखल घेऊन डागडुजी केली. 

मोठी वाहने सतत वरच्या भागाला घासून येत असल्याने दौलताबाद येथील दिल्ली दरवाजा खिळखिळा झाला आहे. कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती या दरवाजाची झाली आहे. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास या दरवाजाचे दगड कोसळले. त्यामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच येथून केवळ एका बाजूची वाहतूक चालते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. हा प्रकार दौलताबाद ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक विक्रम वडणे, छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख, हवालदार एस. के. खटाणे, तरटे, किल्ला सहायक संवर्धक एस. बी. रोहनकर, फायर ब्रिगेडचे एल. एम. गायकवाड, शेख अजीज शेख, तलाठी रघुनाथ शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेले दगड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच, कोसळण्याच्या मार्गावर असलेले दगड जेसीबीने पाडून तेथे सिमेंट, काँक्रीटचे स्लॅब करण्यात आले, परंतु डागडुजी झाली असली तरी दरवाजा केव्हाही कोसळू शकतो, अशी स्थिती आहे. 

गंभीर घटना, तत्काळ दुरुस्ती करावी

ऐतिहासिक दरवाजाचे दगड कोसळणे ही अतिशय गंभीर घटना आहे. पुरातत्त्व विभागाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यापूर्वीही दरवाजाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार दगड कोसळत असताना ते का दुर्लक्ष करतात, हे समजत नाही. वाहतूक दुसरीकडून वळविण्याचा एक पर्याय आहे, पण त्यावर लवकर तोडगा निघणे शक्य वाटत नाही. म्हणून दुरुस्ती करण्याला प्राधान्य द्यावे.
- डॉ. दुलारी कुरेशी, इतिहास तज्ज्ञ

राष्ट्रीय महामार्ग होतो बंद...

दौलताबाद येथील ऐतिहासिक दरवाजाचे दगड कोसळल्यानंतर वाहतूक ठप्प होते. त्यामुळे धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवावा लागतो. कर्नाटक आणि गुजरात राज्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने आधीच जड वाहनांची संख्या जास्त आहे. त्यात अशी काही घटना घडली तर वाहतुकीचा बोजवारा उडतो. 

पर्यटकांची होते तारांबळ

ऐतिहासिक दौलताबाद किल्ला येथे अनेक पर्यटक जातात. तेथूनच वेरूळ लेणीला जाणारा मार्ग आहे. स्थानिक भाविकही खुलताबादला नियमित ये-जा करतात. त्यामुळे औरंगाबाद ते वेरूळ रस्त्यावर पर्यटकांची संख्या मोठी असते. दौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्लीगेट कोसळल्यानंतर या सर्वांचीच प्रचंड तारांबळ उडते. वाहतूक विस्कळीत होते.