होमपेज › Aurangabad › विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 12:30AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. दहा वर्षांपूर्वी पाच हजारांवर परदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते. मात्र, ही संख्या आता शेकड्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असते. शिवाय त्यांच्यामुळे मोठा महसूलही मिळतो.

विद्यापीठात आज येमेन, थायलंड, सुदान, नायजेरिया आदी देशांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येमेन व थायलंडच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पूर्वी या देशांसह इराक व इतरही अनेक देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, मध्यंतरीच्या दोन घटनांनंतर परदेशी विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडील ओढा कमी झाल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या एका विभागातील इराकचे सर्वच्या सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. याशिवाय बेगमपुरा भागात परदेशी विद्यार्थ्यांचे स्थानिकांशी भांडण झाले होते. त्यानंतर इराकने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी पाठविणे बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहर स्वस्त असल्यामुळे परदेशी विद्यार्थी येथे शिक्षणाला पसंती देतात. तथापि, निवास व्यवस्थेच्या अडचणींमुळे त्यांची गैरसोय होत होती. विद्यापीठाने त्यांच्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह उभारले आहे. मात्र, परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येला लागलेली ओहोटी थांबण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाला हे विद्यार्थी मिळावेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दरम्यान, विद्यापीठाच्या विदेशी विद्यार्थी केंद्राचे प्रमुख डॉ. मुस्तजीब खान यांच्याशी संपर्क साधला असता विद्यापीठात 500 च्या आसपास तर संलग्नित महाविद्यालयांत काही असे 800-900 परदेशी विद्यार्थी आहेत, असे ते म्हणाले. 

व्यवस्थापन, वाणिज्य शाखेत 76 परदेशी विद्यार्थी

व्यवस्थापन आणि वाणिज्य शाखेत 76 परदेशी विद्यार्थी असून यातील बहुतेक विद्यार्थी संशोधन करीत आहेत, असे विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.