Mon, May 20, 2019 22:07होमपेज › Aurangabad › मालमत्ता करवाढीच्या  प्रस्तावावर आज निर्णय

मालमत्ता करवाढीच्या  प्रस्तावावर आज निर्णय

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:21AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नवीन मालमत्तांना 25 टक्के करवाढ सुचविणार्‍या मनपा प्रशासनाच्या प्रस्तावावर बुधवारी स्थायी समिती बैठकीत चर्चा होणार आहे, परंतु त्याआधीच सर्वपक्षीय नगरसेवकांनी या करवाढीस विरोध दर्शविला आहे. 

स्थायी समितीची बैठक बुधवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. मनपा अधिनियमातील नियमानुसार पालिका प्रशासनाने नवीन आर्थिक वर्षातील मालमत्ता कर निश्‍चितीसाठीचा प्रस्ताव या बैठकीसमोर सादर केलेला आहे. यात नवीन मालमत्तांना 25 टक्के वाढीव मालमत्ता कर लावण्याची शिफारस केली आहे. सध्या नोंदणीकृत असलेल्या जुन्या मालमत्तांच्या करात मात्र कोणताही बदल सुचविण्यात आलेला नाही. मालमत्ता कर आकारणीत निवासी, निवासेतर, व्यावसायिक व औद्योगिक, शैक्षणिक संस्था, भारत सरकारच्या मालमत्ता, मोबाइल टॉवर्स असे गट करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत शहरात साडेतीन लाखांहून अधिक मालमत्ता आहेत, परंतु मनपाने आतापर्यंत 2 लाख मालमत्तांना कर लावलेला आहे. त्यामुळे या प्रस्तावानुसार दोन लाख मालमत्तांच्या मालमत्ता करात कोणताही बदल होणार नाही. उर्वरित दीड लाख मालमत्तांना कर लागणे बाकी आहे. या मालमत्तांना कर लावताना तो 25 टक्के वाढीव दराने आकारावे असे यात म्हटलेले आहे. मात्र आता या प्रस्तावास एमआयएमसह भाजप आणि शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत फेटाळला जाण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपासून तोच कर

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मनपाने नवीन आर्थिक वर्षातील कराचे दर निश्‍चित करावेत, असा नियम आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून दरवर्षी हा ठराव ठेवण्यात येतो. मात्र मागील पाच वर्षांत एकदाही कर वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे 2012 सालापासून आतापर्यंत तेच कर असल्याची माहिती मनपाच्या अधिकार्‍यांनी दिली.