होमपेज › Aurangabad › मोफत गॅस वाटपावेळी नारेगावात महिलेचा मृत्यू 

मोफत गॅस वाटपावेळी नारेगावात महिलेचा मृत्यू 

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 26 2018 12:16AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटताना तेराशे ते पंधराशे रुपये वसूल करीत असल्याची तक्रार आल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना नगरसेवकासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकावले. तसेच, त्यांच्या घरी जाऊन गोंधळ करीत मारहाण केली. या तणावातून शारदाबाई अभिमन्यू भालेराव (वय 55, रा. अशोक नगर, नारेगाव) या महिलेचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. या प्रकरणी नगरसेवक राजू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शुक्रवारी (दि. 25) मृताच्या नातेवाइकांनी केली.  

मृत शारदा भालेराव यांची मुलगी नीता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 19 मे रोजी नगरसेवक राजू शिंदे व सहकार्‍यांनी नारेगाव येथे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या योजनेतून गरिबांना मोफत गॅस मिळाला पाहिजे, परंतु नगरसेवकाचे कार्यकर्ते महिलांकडून प्रत्येकी तेराशे ते पंधराशे रुपये घेत होते. या वसुलीबाबत महिलांनी नीता भालेराव यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, सामाजिक कार्यकर्त्या दीपा मिसाळ व नीता भालेराव या एजन्सीत गेल्या. 

तेथे त्यांनी जाब विचारला असता नगरसेवकासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. यानंतर गुरुवारी सायंकाळी राजू शिंदे व त्यांचे सहकारी भालेराव यांच्या घरी आले. घरी नीता भालेराव नसल्याने त्यांनी त्यांच्या आईला धमक्या दिल्या व मुलीला मारून टाकू असे सांगितले. त्यामुळे नीता यांच्या आई शारदाबाई घाबरल्या व अस्वस्थ पडल्या. नीता घरी आल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. राजू शिंदे यांनी धमकी दिल्यामुळे आई तणावात होती. यातूनच त्यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. या प्रकरणात नगरसेवक शिंदे व इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नीता भालेराव यांनी केली. शुक्रवारी पोस्टमार्टमनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास भालेराव कुटुंबीयानी नकार दिला होता, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.