Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Aurangabad › जननी मृत्यूबाबत आरोग्य प्रशासनाचा असंवेदनशीलपणा

जननी मृत्यूबाबत आरोग्य प्रशासनाचा असंवेदनशीलपणा

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 05 2018 11:18PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर 

महिला व बाल आरोग्यावर कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे. गर्भवती महिलांना सकस आहार देण्यासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून यंत्रणा राबवली जात आहे, परंतु गत महिनाभरात जिल्ह्यात तीन गभर्वती महिलांचा मृत्यू झाल्याने या प्रश्‍नाबाबत आरोग्य यंत्रणा तितकीशी गंभीर नसल्याचेच समोर आले आहे.

जननी व नवजात बालक यांना प्रसूती दरम्यान मृत्यू येऊ नये म्हणून युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटर नशनल चिल्ड्रन एमरजन्सी फंड व रिप्रोडोक्हिन अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थ प्रोग्राम) यांच्या कडून भारत सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येते.  जननी व नवजात बालक यांच्या मृत्यू दरावरून देशाच्या विकसनशिल देशाबाबतचे प्रमाण मानले जाते. अशा परिस्थीतीमध्ये  काही दिवसांपूर्वी माजलगाव, नेकनूर व केज या ठिकाणी तीन महिलांचा प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्रावमुळे मृत्यू झाला. यातील केजची घटना अद्याप प्रकाशात आलेली नाही, तसेच माजलगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात अशाच प्रकारे जननीचा मृत्यू झाला. संबंधीत डॉक्टरांनी रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले असता जास्त रक्तस्त्राव व रक्तदाबामुळे या जननीचा वाटेतच मृत्यू झाला. अशा घटनेबाबतची कारणे  शोधण्याचा प्रयत्न देखील आरोग्य विभागाकडून केला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.