होमपेज › Aurangabad › गर्भवती महिलेचा मारहाणीत मृत्यू

गर्भवती महिलेचा मारहाणीत मृत्यू

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घरासमोरील हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईक तरुणांच्या टोळक्याने गोंधळ घालून शुक्रवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर रक्तस्राव होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या गर्भवतीचा दहा दिवसांनंतर सोमवारी (दि. 12) पहाटे साडेचार वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या प्रकरणी मारहाण झाली तेव्हाच क्रांती चौक ठाण्यात तक्रार दिलेली असतानाही काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.

मंजूषा अजय कदम (31, रा. कदम निवास, पैठणगेट) असे मृत महिलेचे नाव असून, ती दोन महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, दरम्यान, रात्री उशीरा या प्रकरणात चार आरोपींविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजूषाचा पती घराजवळील एका औषधी दुकानामध्ये कामाला आहे. तिला सात वर्षांचा एक मुलगा आहे. 2 फेब्रुवारी रोजी शेजारच्या एका कुटुंबीयांचा हळदीचा कार्यक्रम होता. मंजूषा यांच्या घरासमोर मोकळी जागा असल्याने तेथे मंडप टाकलेला होता. दरम्यान, मध्यरात्री तरुणांच्या टोळक्याने मंजूषा यांच्या पुतण्याला मारहाण केली. हा प्रकार पाहिल्यावर त्या भांडण सोडविण्यासाठी आल्या. त्यावेळी टोळक्याने मंजूषा यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शनिवारी रक्तस्राव होऊ लागल्यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. दरम्यान, सहा दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी गर्भ काढण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी (दि. 9) गर्भ काढण्यात आला. त्यानंतर सोनोग्राफी केली. त्यात डॉक्टरांनी पोटात पस तयार झाल्याचे सांगून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. तसेच, हे ऑपरेशन येथे होणार नाही म्हणून मंजूषा यांना घाटीत हलविले. शनिवारी त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता ऑपरेशनला सुरुवात केली. रात्री 9 वाजता ऑपरेशन संपले. त्यानंतर प्रकृती ठीक असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. रविवारी दिवसभर प्रकृती ठीक होती. रात्रीतून मंजूषा यांची प्रकृती बिघडली. सोमवारी पहाटे साडेचार वाजता डॉक्टरांनी मंजूषा यांना मृत घोषित केले. 

कारवाईचे आश्‍वासन दिल्यावर अंत्यसंस्कार
सोमवारी पहाटे मंजूषा कदम यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर नातेवाइकांनी क्रांती चौक ठाण्याशी संपर्क साधून मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात येऊ, असा इशारा दिला, परंतु उपनिरीक्षक संजय बनकर यांनी घाटीत धाव घेत नातेवाइकांची समजूत घातली. त्यांना कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यानंतर मृत्यूचा पंचनामा केलागुन्हा दाखल, शोध सुरू 
मंजुषा कदम मृत्यू प्रकरणात शेखर संजय कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी मानव दीपक कदम, गोट्या कांबळे, सचिन सातपुते, आदित्य उबाळे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून क्रांती चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय बनकर अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.