होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दगडाखाली दबून एका वृध्दाचा मृत्यू 

औरंगाबाद : दगडाखाली दबून एका वृध्दाचा मृत्यू 

Published On: May 11 2018 6:41PM | Last Updated: May 11 2018 6:41PMअंधारी : प्रतिनिधी 

अंधारी येथील कानिफनाथ मंदिराजवळील शिवारात एका वृध्दाचा दगडाखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काशिनाथ संतूबा थोरात  (वय -६८) असे या वृध्दाचे नाव आहे. आज, शुक्रवार (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, काशिनाथ थोरात यांचे कानिफनाथ मंदिराजवळील झाडी वस्ती शिवारात शेत आहे.  त्यांचा मुलगा गजानन हा आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी गेला होता. यावेळी या परिसरात दूर्गंधी पसरली होती. गजानन याने हा वास कोठून येत असल्याची शोधाशोध केली. 

यावेळी त्याला शेतातील एका दगडाखाली दबलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. आपल्या वडिलांचा मृतदेह पाहताच गजानन याने आक्रोश केला. तर जोरजोराने आरडाओरड करून आजूबाजू परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी हजारो ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.

सदरील घटनेची माहिती अंधारी येथील पोलीस पाटील कल्पना दिनेश खराते यांना देण्यात आली. त्यांनी याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली असता सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील पोलिस कॉन्स्टेबल पी. के. शिंदे, पि. टी  शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन चौधरी यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात दोन मुले, चार मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. यासंबंधी पोलिस अधिक करीत आहेत.