Sat, Mar 23, 2019 12:19होमपेज › Aurangabad › डार्विनचा सिद्धांत चुकीचा : डॉ. सत्यपाल सिंह

डार्विनचा सिद्धांत चुकीचा : डॉ. सत्यपाल सिंह

Published On: Jan 19 2018 3:03PM | Last Updated: Jan 19 2018 3:03PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माकडांपासून मनुष्याची उत्पत्ती झाली, हा डार्विन यांचा सिद्धांतच चुकीचा असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी येथे सांगितले. अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्घाटन सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात डॉ. सिंह यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी सत्यपाल सिंह बोलत होते. 

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, दुर्गादास मुळे, गणेश्‍वरशास्त्री द्रविड, अनिल भालेराव आदी या वेळी उपस्थित होते.

भारतातील विद्यापीठांमधून सर्रास चुकीचे शिक्षण दिले जात आहे. माकडांपासून मनुष्याची उत्पत्ती झाली तसेच जंगलात पशु- प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य बोलायला शिकला, असे शिकविले जाते. प्रत्यक्षात मनुष्याची उत्पत्ती ही माकडांपासून नव्हे, तर मनुष्यापासूनच झाली आहे. माकडांपासून उत्पत्ती झाली, अशी शिकवण देणार्‍यांची निर्मिती कदाचित माकडांपासून झाली असावी, अशी टीका डॉ. सिंह यांनी केली. पशु-प्राण्यांपासून मनुष्य बोलायला शिकला असल्याचे वाटणार्‍यांनी त्यांच्या मुलांना जन्मताच जंगलात पाठवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

वेदाचा अभ्यासक्रमांत समावेश

सूर्य, समुद्र यांच्या प्रमाणेच सृष्टी अस्तित्वात येण्यापूर्वी वेदांची निर्मिती झाली आहे. वेद हे जीवनाचे शास्त्र आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांत त्यांचा समावेश केला जाईल, अशी घोषणाही डॉ. सत्यपाल सिंह यांनी केली. वेदांचे अध्ययन व प्रचार करणार्‍या संस्था आणि विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख आणि एक लाख रुपयांचे अकरा पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.