Mon, May 20, 2019 20:32होमपेज › Aurangabad › दैनिक पुढारीचा दणका;  शिऊरमध्ये नवे ग्रामविकास अधिकारी होणार रुजू

दैनिक पुढारीचा दणका;  शिऊरमध्ये नवे ग्रामविकास अधिकारी होणार रुजू

Published On: Jun 18 2018 2:59PM | Last Updated: Jun 18 2018 2:59PMशिऊर : सौरभ लाखे

वैजापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व १७ सदस्यीय असणाऱ्या शिऊर ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून ग्रामसेवक जी.आर.गायकवाड हे बघत होते. शिऊर येथील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हा परिषदेने त्यांच्या जागी नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली केली. मात्र  प्रशासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पदभार दिला नव्हता. ‘दैनिक पुढारी’ने या बाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करताच निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग आली. शिऊर येथे नवीन ग्रामविकास आधिकाऱ्यानी पदभार घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामविकास आधिकारी चाबुकस्वार हे मंगळवार पासून शिऊर ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारणार आहे. 

शिऊर गावातील प्रशासकीय कामे गतीमान पद्धतीने मार्गी लागावी यासाठी शिऊर ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास अधिकारी पदाचा दर्जा आहे मात्र गेल्या पाच वर्षांपासून ग्रामसेवकच हा कारभार बघत असल्याने विकासाला खीळ बसत होती. त्यातच त्याचा 'हम करो सो कायदा' या वृत्तीमुळे नागरिकांच्या पदरी मनस्तापाशिवाय काहीच  पडत नव्हते. त्यांच्या मनमानी पद्धतीला वैतागलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीची मागणी करत ठराव घेतला. त्यावर देखील काहीच कार्यवाही झाली नाही. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक गायकवाड यांच्या बदलीचे आदेश काढत कायगाव येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी चाबुकस्वार यांची शिऊर येथे बदली करण्याच्या सूचना केल्या. चाबुकस्वार यांनी कायगाव येथील पदभार सोडून वैजापूर पंचायत समितीत रुजू झाले मात्र पंधरा दिवस उलटूनही त्यांना शिऊर येथील पदभार दिला गेला नव्हता. ‘दैनिक पुढारी’ने दि.१५ जून रोजीच्या अंकात "शिऊर ग्रा.पं कारभार ग्रामसेवकाच्या भरवशावर" या मथल्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत वैजापूर पंचायत समिती प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी चाबूकस्वार यांना शिऊर येथे पदभार घेण्यास आदेशित केले या नुसार चाबूकस्वार आज मंगळवार  रोजी शिऊर  ग्रा.पं चा ग्रामविकास आधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. 

शिऊर येथे ग्रामसेवक जी.आर.गायकवाड यांच्या विरोधात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. विविध योजना राबवताना होणारी दिरंगाई, ग्रामस्थांना दिली जाणारी वागणूक, कार्यालय वगळता गावात नसणारा संपर्क आदी बाबींवर ग्रामस्थ नाराज होते तसेच त्यांची बदली करण्याची एकमुखी मागणी देखील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली होती. अखेर त्यांची बदली झाल्याने विकास कामे व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जातील अशी दबक्या आवाजात गावात चर्चा सुरु आहे. 

दैनिक पुढारीचा दणक्याने प्रशासन गतिमान

शिऊर येथील ग्रामसेवक गायकवाड यांच्या बदलीचे व नवीन ग्रामविकास अधिकारी नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेने दिल्यानंतर देखील त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत होता. दि १५ मे रोजी जिल्हा परिषदेने आदेशित करून सुद्धा त्यांचा आदेश बासनात गुंढाळण्यात आला होता दि १५ जून रोजी सर्वप्रथम पुढारीने या बाबत वृत्त प्रकाशित केले त्यानंतर प्रशासन गतिमान झाले व चाबूकस्वार यांना शिऊर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. 

शिऊर येथे ग्रामविकास आधिकारी पदावर काम करण्याचे आदेश सोमवारी मिळाले असून आज मंगळवार पासून शिऊर ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारणार आहे, असे नवे ग्रामविकास अधिकारी चाबूकस्वार यांनी सांगितले.