Mon, Aug 19, 2019 11:11होमपेज › Aurangabad › बनावट चेकद्वारे बँकांना कोट्यवधींचा गंडा

बनावट चेकद्वारे बँकांना कोट्यवधींचा गंडा

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बोगस कागदपत्रांद्वारे बँकेत खाते उघडायचे... त्यानंतर मिळालेल्या धनादेशाचा (चेकबुक) वापर करून क्‍लोन चेक तयार करायचा आणि थेट कॉर्पोरेट खातेदारांसह बँकांनाच गंडवायचे... महाराष्ट्रासह देशभरात अशाच पद्धतीने शेकडो बँका आणि नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावणार्‍या आंतरराज्य टोळीचा औरंगाबाद गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.

पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोपींचा समावेश असलेल्या या टोळीतील पाच जणांच्या मुंबई आणि सिंधुदुर्ग भागातून मुसक्या आवळल्याची माहिती पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

हरीश गोविंद गुंजाळ (39, रा. मानगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), मनीषकुमार जयराम मौर्या ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष रामलाल यादव ऊर्फ अमित रमेशसिंग (23, रा. सिखडी, जि. भदोनी, उत्तर प्रदेश), मनदीपसिंग बनारसीदास सिंग (29, रा. दीनानगर, जि. गुरूदासपूर, पंजाब) रशीद इम्तियाज खान (50, रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश, ह.मु. नालासोपारा, पालघर) आणि डबलू शेख अरमान शेख (32, रा. कमलसागर, जि. वर्धमान, पश्‍चिम बंगाल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

त्यांना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून पावणेदोन लाखाच्या रोकडसह संगणक, प्रिंटर, 27 एटीएम कार्ड, 15 मोबाइल, 26 बँकांचे चेकबुक, 9 रबरी शिक्के, मतदान कार्ड, पॅनकार्ड, नोटा मोजण्याचे यंत्र आणि एक कार असा सुमारे नऊ लाख 89 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बनावट चेकबुक तयार करण्यासाठी ही टोळी उच्च प्रतीचा कागद आणि कलर प्रिंटरचा वापर करायची, असेही तपासात समोर आले. 

या प्रकरणी पारिजातनगर (एन-4, सिडको) येथील टीजेएसबी बँकेचे शाखा व्यवस्थापक संग्राम सदानंद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शाखेमध्ये 1 जूनला हरीश इंटरप्रायजेसचा संचालक हरीश गुंजाळ याने गोजीत फायनांशियल सर्व्हिसेस नावाने क्‍लोन (बनावट) चेक टाकला. हा चेक वटवून गुंजाळ यांनी 3 लाख 93 हजार 264 रुपये काढून घेतले. यानंतर पुन्हा याच कंपनीच्या नावाने दुसरा 4 लाख 80 हजारांचा चेक वटवण्यासाठी टाकला. मात्र, त्यापूर्वीच बँकेला गुंजाळ याने ज्या चेकद्वारे रक्‍कम वटवली होती, तो दुसर्‍याच्या नावावर असून त्याचा मूळ खातेदार वेगळा असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी बँकेने पोलिस आयुक्‍तांकडे धाव घेत माहिती दिली.

जनसंपर्क अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सर्व माहिती घेतली. त्यानंतर आयुक्‍तांनी हे प्रकरण गुन्हे शाखेला तपासण्यास सोपवण्यात आले. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने हरीश गुंजाळ राहत असलेले एन-2 येथील घर गाठले. मात्र, तो घरी आढळून आला नाही. पोलिसांनी कौशल्याने तपास करीत मुंबई, सिंधुदुर्ग येथून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने गुजरातमधील मणीनगर, सुरत, महाराष्ट्रातील कराड, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, केरळमधील एर्नाकुलम मध्य प्रदेश आदी ठिकाणी बँकांना बनावट चेक देऊन जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.