Mon, Sep 24, 2018 23:28होमपेज › Aurangabad › गुन्हे घटले, पोलिसांची प्रतिमा मात्र डागाळलेलीच

गुन्हे घटले, पोलिसांची प्रतिमा मात्र डागाळलेलीच

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीअखेर गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्‍त रामेश्‍वर थोरात यांनी केला, परंतु कचरा प्रश्‍नावरून पोलिसांनी मिटमिट्यात केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मात्र डागाळली आहे. आता गुन्हे रोखण्याबरोबरच प्रतिमा सुधारण्यासाठी काम होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्‍त होत आहे.

गतवर्षी 28 एप्रिल रोजी पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी मावळते पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार यांच्याकडून औरंगाबाद शहर पोलिस दलाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी माध्यमांसह सर्वांनी ‘सिंघम, दबंग’ अशी तुलना करून मोठ्या अपेक्षा व्यक्‍त केल्या होत्या. त्यांनीही देशातील सर्वांत सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख करण्याचा मानस व्यक्‍त करीत सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेर्‍याला प्राधान्य देऊन आपण टेक्नोसॅव्ही असल्याचे दाखवून दिले होते. परंतु, वर्ष उलटले तरी यातील बहुतांश बाबी कागदावरच आहेत.

पेट्रोलिंग वाहनांना जीपीएस प्रणाली बसवून त्यांनी गस्ती पथकाला तेवढी शिस्त लावली. त्यामुळे रात्र गस्तीवरील वाहने एका ठिकाणी उभी करून आराम करणार्‍या कर्मचार्‍यांना लगाम बसला. दरम्यान, शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्‍त (गुन्हे) रामेश्‍वर थोरात यांनी केला, परंतु मिटमिटावासीयांना पोलिसांनी दिलेल्या यातना कमी करून या प्रकरणात पोलिसांची डागाळलेली प्रतिमा पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आता वरिष्ठांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.