Sat, Apr 20, 2019 18:25होमपेज › Aurangabad › पोलिसाला शूट करतो म्हणणार्‍या सहायक फौजदाराविरुद्ध गुन्हा

पोलिसाला शूट करतो म्हणणार्‍या सहायक फौजदाराविरुद्ध गुन्हा

Published On: Mar 23 2018 2:15AM | Last Updated: Mar 23 2018 2:15AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ठाण्यात येऊन पिस्टल काढत ‘आता त्या पोलिसाला शूट करतो’ असे म्हणून धमकी देणार्‍या सहायक फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उस्मानपुरा ठाण्यात 22 मार्च रोजी ही घटना घडली. आयुब पठाण असे गुन्हा नोंद झालेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ते जिन्सी ठाण्यात कार्यरत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कबीरनगरातील धु्रपदाबाई वामन गायकवाड (60) आणि वामन किसन गायकवाड (65) हे ज्येष्ठ दांपत्य गुरुवारी उस्मानपुरा ठाण्यात आले. त्यांनी मुलगा त्रास देत असल्याची तक्रार करीत त्याला समजावून सांगण्याची विनंती पोलिसांकडे केली. त्यावरून कर्तव्यावरील उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी पिटर मोबाइल व्हॅनमधून गायकवाड दांपत्य आणि तीन कर्मचार्‍यांना कबीरनगरमध्ये पाठविले. कबीरनगरमध्ये अरुंद रस्ते असल्याने पिटर मोबाइल व्हॅनच्या चालकाने समोरून आलेल्या कारला लाईट दाखवून थांबण्याचा इशारा केला, परंतु कार काही थांबली नाही. या कारमध्ये जिन्सी ठाण्यातील सहायक फौजदार आयुब पठाण, त्यांचा मुलगा हे होते. मुलगा कार चालवित होता.

या प्रकारामुळे आयुब पठाण यांनी पिटर मोबाइल व्हॅनवरील कर्मचार्‍यांशी वाद घातला. त्यानंतर पिटर मोबाइल व्हॅन कबीरनगरात पुढील कामकाजासाठी गेली, परंतु आयुब पठाण हे उस्मानपुरा ठाण्यात आले. त्यांनी पिटर मोबाइल व्हॅनच्या चालकाविरुद्ध तक्रार द्यायची असल्याचे सांगून ठाण्यात गोंधळ घातला. पिस्टल काढून गुन्हा नोंदविण्यासाठी उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना अरेरावी केली. तसेच ‘आता त्या चालकाला शूट करतो’ अशी धमकी देऊन ठाण्यातून निघून गेले. या प्रकरणी चालक वसंत भावे (बक्‍कल नं. 2673) यांच्या फिर्यादीवरून आयुब पठाणविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. 

Tags : Aurangabad, Aurangabad News,Crime against against a serving police officer who give threat shoots a policeman