Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Aurangabad › कॉपी पकडल्यानंतर आत्महत्येची धमकी देत विद्यार्थी बाहेर पळाला

कॉपी पकडल्यानंतर आत्महत्येची धमकी देत विद्यार्थी बाहेर पळाला

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कारवाईपासून वाचण्यासाठी कॉपीबहाद्दर विद्यार्थी आत्महत्येच्या धमक्या देऊन ब्लॅकमेलिंग करू लागले आहेत. ज्युबली पार्क येथील डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन येथे शनिवारी (दि. 21) कॉपी पकडली जाताच बी.एड.चा विद्यार्थी आक्रमक झाला. मी 35 लाख रुपये दिले आहेत, मला पेपर लिहू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन, असे म्हणत तो गॅलरीकडे पळत सुटला. पर्यवेक्षिका आणि सहायक यांनी महत्प्रयासाने त्याला रोखले. परीक्षेनंतर या विद्यार्थ्यावर मालप्रॅक्टिसची कारवाई करण्यात आली. तसेच त्याने आत्महत्येची धमकी दिल्याचे लेखी तक्रारीद्वारे पोलिस व विद्यापीठ प्रशासनाला कळविण्यात आले.

एमआयटी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली. या घटनेने कॉपी करणार्‍या विद्यार्थ्याला पकडावे की नाही हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महाविद्यालयात 10 एप्रिलपासून बी.एड.ची परीक्षा सुरू आहे. उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आज 810 विद्यार्थ्यांचा पेपर होता. सकाळी दहा ते साडेअकरा ही परीक्षेची वेळ होती. संबंधित विद्यार्थ्याचा पेपर दुसर्‍या मजल्यावरील एम-3 या हॉलमध्ये होता. पेपर संपायला 20 मिनिटे उरली असताना पर्यवेक्षिका शबिना खान यांनी त्या विद्यार्थ्याची कॉपी पकडून उत्तरपत्रिका ताब्यात घेतली. तेव्हा उर्दू माध्यमाचा हा विद्यार्थी आक्रमक झाला. मी कॉपी केली नाही. मी नोकरीसाठी 35 लाख रुपये दिले आहेत. मला पेपर लिहू द्या,  नाही तर मी आत्महत्या करेन, असे म्हणत त्याने गॅलरीकडे धाव घेतली. पर्यवेक्षिका शबिना आणि सुपरवायझर सबा नाजनीन या दोन्ही महिला. बाका प्रसंगाने त्या हबकून गेल्या. मात्र, प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी या विद्यार्थ्याला रोखले आणि उत्तरपत्रिका परत देत त्याची समजूत काढली.

त्यानंतर केंद्रप्रमुख डॉ. विद्या प्रधान आणि सहकेेंद्रप्रमुख डॉ. वि. रा. मोरे परीक्षा हॉलवर आले. त्यांनी विद्यार्थ्याला पेपर देऊ दिला. पेपर देऊन तो निघून गेल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या दरम्यान विद्यापीठाचे भरारी पथक परीक्षा केंद्रावर आले. पथकाने घटनेची माहिती घेऊन अहवालात त्याची नोंद केली. या पथकात डॉ. विक्रम खिलारे आणि प्रा. एस. टी. अलोने यांचा समावेश होता. एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्याची कॉपी पकडल्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पर्यवेक्षिकेसह प्राचार्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी प्राध्यापक आणि प्राचार्यांनी जोरदार आघाडी उघडलेली आहे. 

एमआयटी प्रकरण मुळाशी

एमआयटीच्या प्रकरणात प्राध्यापक आणि प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाल्याचा कॉपीबहाद्दर विद्यार्थी गैरफायदा घेणार आहेत. आजची घटना त्याचेच द्योतक आहे. आत्महत्येची धमकी दिली की, प्राध्यापक घाबरतात, अशी त्यांची धारणा झाली आहे. अशा घटनांमुळे प्राध्यापकांचे मनोधैर्य खचते. मग कॉपीमुक्‍त अभियान कसे राबविणार, असा सवाल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांनी केला. 

Tags : Aurangabad, Copy capture, students, suicide threat,