Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Aurangabad › चाकूहल्ल्यात ‘कूक’ गंभीर : सततच्या लुटमारीच्या घटनांनी जिल्हा हादरला

चाकूहल्ल्यात ‘कूक’ गंभीर : सततच्या लुटमारीच्या घटनांनी जिल्हा हादरला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

गजबजलेल्या जालना रोडवरील केेेम्ब्रिज चौकाजवळच असलेल्या हॉटेल ‘स्पायसी क्रंच’मध्ये शस्त्रधारी दरोडेखोरांनी धुडगूस घालत स्वयंपाक्यावर (कूक) चाकूहल्ला करीत लुटमार केली. यात कूक दिलीपसिंग बहादूरसिंग बिस्त (30, रा. उत्तराखंड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये एमआयसीयू वॉर्डात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पहाटे 2 ते 2.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मागील आठ दिवसांत जिल्ह्यात दरोड्याची ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील विजय सांबरे पाटील यांचे केम्ब्रिज चौकाच्या पुढे जालना रोडवर ‘स्पायसी क्रंच’ नावाचेे हॉटेल आहे. येथे एका महिलेसह पाचजण काम करतात. त्यात स्वयंपाकी म्हणून दिलीपसिंग बिस्त हा आहे. तो उत्तराखंडचा राहणारा असल्याने हॉटेलातच मुक्‍कामी असतो. सोमवारी रात्री हॉटेल बंद करण्यात आले. इतर कामगार घरी गेल्यानंतर दिलीपसिंग बिस्त तेथेच अंथरूण टाकून झोपला. दरम्यान, मध्यरात्रीनंतर पहाटे 2 ते 2.15 वाजेच्या सुमारास चार शस्त्रधारी दरोडेखोर हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी सरळ दिलीपसिंगवर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आत दोघांनी दिलीपसिंगचे हात धरून अन्य एकाने त्याच्या पोटात चाकू खुपसला, तर दुसर्‍याने खिशात हात घालून अंदाजे 800 रुपये काढून घेतले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिस्त पूर्णपणे घाबरला. त्यात चाकू पोटात खोलवर खुपसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला प्रतिकार करता आला नाही. बिस्त गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळल्यानंतर दरोडेखोर पसार झाले.