Thu, Jun 20, 2019 01:23होमपेज › Aurangabad › पाणीपुरवठ्याच्या कंत्राटी लाइनमनचे दोन महिन्यांपासून पगार रखडले

पाणीपुरवठ्याच्या कंत्राटी लाइनमनचे दोन महिन्यांपासून पगार रखडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्याच्या कामावर देखरेख ठेवणार्‍या 108 कंत्राटी लाइनमनचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहेत. आता तिसरा महिनाही संपत आला असून, ठेकेदार आणि मनपा प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे लाइनमन त्रस्त झाले आहेत. 

जायकवाडीतून आणलेले पाणी शहरात विविध ठिकाणच्या टाक्यांमध्ये साठवले जाते. हे पाणी टप्प्याटप्प्याने परिसरातील वसाहतींना पुरवठा केले जाते. या वसाहतींच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी तत्कालीन युटिलिटी कंपनीने कंत्राटी तत्त्वावर 108 कर्मचार्‍यांना घेतले होते. मात्र कालांतराने युटिलिटी कंपनीकडून पाणीपुरवठ्याचा कारभार काढून घेण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासन पाणीपुरवठा करत आहे. कंपनीचे हे कंत्राटी कर्मचारी मनपाने कायम ठेवले. ऑगस्ट 2017 पर्यंत या कर्मचार्‍यांचे पगार देण्यात आलेले आहेत. दरम्यान, मनपाने ठेकेदार बदलला. त्यामुळे पुन्हा या कर्मचार्‍यांच्या पगाराचे वांधे झाले आहेत. सध्या राणा कन्स्ट्रक्शनतर्फे या ठेकेदारांमार्फत हे कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचार्‍यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. आता नोव्हेंबर महिनाही संपत आला आहे. 

पगार वेळेवर व्हावा, यासाठी सर्व कंत्राटी लाइनमन कर्मचार्‍यांनी गेल्या आठवड्यात महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली होती. त्या वेळी महापौरांनी ठेकेदाराला बोलावून घेतले, तेव्हा 24 तारखेपर्यंत सर्वांचे पगार देण्याचे आश्‍वासन ठेकेदाराने दिले होते. मात्र 24 रोजीही पगार मिळाला नाही. पाणी सोडल्यानंतर त्या वसाहतींमध्ये जाऊन पाणी आले की नाही, याची पाहणी करणे, पाइपलाइन लिकेज तपासणे, यासह विविध कामांसाठी फिरावे लागत असल्याने वाहनाच्या पेट्रोलवर खर्च होतो, शिवाय कुटुंबांचा दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले असून, दोन-दोन महिने पगार होत नसल्याने अडचणी वाढल्या असून, कौटुंबिक ताणतणाव निर्माण होत असल्याचे लाइनमन्सनी सांगितले.