Fri, Apr 26, 2019 18:16होमपेज › Aurangabad › निम्म्या शहराला दूषित पाणी पुरवठा

निम्म्या शहराला दूषित पाणी पुरवठा

Published On: Apr 13 2018 1:53AM | Last Updated: Apr 13 2018 1:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एकीकडे कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरलेली महानगरपालिका दुसरीकडे शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यातही सपशेल अपयशी ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आजघडीला शहरातील तब्बल 4 जलकुंभ आणि 25 वसाहतींमध्ये चक्क  दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे छावणीतील प्रयोगशाळेतून आलेल्या पाणी तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. कचर्‍याच्या धोकादायक विल्हेवाटीपाठोपाठ मनपा दूषित पाणी पाजून नागरिकांच्या जीवाशीही खेळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

काही दिवसांपूर्वी अशाच दूषित पाण्याने छावणीत हाहाकार माजविला होता. छावणी परिषदेच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याने या भागात हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. दूषित पाण्यामुळे आता अशीच परिस्थितीत संपूर्ण शहरातही उद्भवू शकते, हे विशेष. एकतर गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण औरंगाबाद शहर हे मनपा प्रशासन आणि पदाधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे ‘कचराकोंडी’चा सामना करीत आहे.

या कचरा कोंडीमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगाव डेपोत कचरा टाकणे बंद झाल्यापासून शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या कचर्‍याची मनपा अत्यंत धोकादायक पद्धतीने विल्हेवाट लावत असल्याचे समोर आले आहे. कधी हा कचरा जाळून पर्यावरणात विषारी वायू सोडण्यात येत आहे, तर काही ठिकाणी गुपचूप हा कचरा पुरुन टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहरात रोगराई वाढली आहे. अशातच शहरात होणार्‍या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांनी झोप मनपाने उडविली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. सुरुवातीला मनपा प्रशासन आणि पदाधिका-यांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. परिमाणी, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. 

Tags : Aurangabad, Contaminated, water, supply, half, city