Tue, Mar 26, 2019 11:43होमपेज › Aurangabad › आणखी २५ वर्षे काँग्रेसची सत्ता नाही : दानवे 

आणखी २५ वर्षे काँग्रेसची सत्ता नाही : दानवे 

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यात आणखी 25 वर्षे काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शिवसेनेसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष सोबत राहावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीची माहिती खा. दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, अनिल मकरिये आदी या वेळी उपस्थित होते. शिवसेनेने भाजपसोबत युती न केल्यास आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असे वक्‍तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

या वक्‍तव्याकडे लक्ष वेधले असता, खा. दानवे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर येईल, ही कल्पनाच चुकीची आहे. सध्याची परिस्थिती पाहता आणखी 25 वर्षे तरी राज्यात काँग्रेस सरकार येणार नाही. शिवसेनेसह सर्व मित्रपक्ष सोबत राहावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र मित्रपक्ष सोबत न आल्यास त्यांच्याशिवाय भाजप निवडणुकीस तोंड देईल. 2014 नंतर भाजपने 22 राज्यांतील निवडणुका जिंकल्या. ओडिसा, केरळ, प.बंगाल सारख्या राज्यातही पक्षाच्या जनाधारात वाढ झाली आहे. 

भाजपची अशीच घोडदौड सुरू राहिल्यास आपल्या ताब्यातील सत्ता जाण्याची प्रादेशिक पक्षांना भीती वाटत असल्याने ते भाजपविरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न करीत असल्याचे खा. दानवे यांनी नमूद केले.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज होणार्‍या चढउताराचा परिणाम पेट्रोल- डिझेलवर होत आहे. त्यातच विविध करांमुळे किमती आणखी वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अखत्यारित आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटी लागू झाल्यास त्यांचे दर नियंत्रणात राहतील, असे खा. दानवे यांनी सांगितले.

सर्वच क्षेत्रांत भरीव कामगिरी

शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, अशा सर्वच क्षेत्रांत केंद्र सरकारने मागील चार वर्षांच्या कालावधीत भरीव कामगिरी केली. शेतकर्‍यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून अनेक चांगले निर्णय घेतले. शेतकर्‍यांना अल्पदरात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून दिली. रब्बी पिकांसाठी दीड रुपये, तर खरिपासाठी अडीच रुपयांत पीक विम्याचा लाभ देण्याची योजना सुरू केली. देशात परकीय गुंतवणूक वाढत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याचेही खा. दानवे यांनी सांगितले.