Wed, Feb 20, 2019 08:38होमपेज › Aurangabad › .राज्य सरकार असंवेदनशील : अशोक चव्हाण

.राज्य सरकार असंवेदनशील : अशोक चव्हाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

शेतकरी, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरलेले राज्य सरकार असंवेदनशील आहे. अशा सरकारबरोबर सत्तेत राहिल्याने आपली बदनामी होऊ नये, तसेच जनतेची सहानुभूती टिकून राहावी, यासाठीच भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केला.

राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांच्या वतीने येत्या 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची येथे बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. 

राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कर्जमाफीसाठी जाहीर करण्यात आलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतर बहुतांश शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका चव्हाण यांनी केली. कापूस, सोयाबीन सारख्या पिकांची ऑनलाइन खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांसाठी अडचणीचा ठरत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नाहीत, त्यातच विजेचे भारनियमन असल्याने ऑनलाइन अर्ज करणे शक्य होत नाही. त्यामुळे ऑनलाइन खरेदी प्रक्रिया तातडीने बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या  शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीत लोकहितकारी निर्णय घेण्यास भाग पाडणे गरजेचे आहे, मात्र बैठकीत एकमत आणि बाहेर विरोध, ही त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गुजरातची धास्ती

गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचणार आहे. राहुल गांधी यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. केंद्राचे अपयश गुजरात निवडणुकीत समोर येऊ नये, यासाठीच संसदेचे हिवाळी अधिवेशन तब्बल महिनाभर लांबणीवर टाकल्याचा आरोप त्यांनी केला. माजी मंत्री आ. हर्षवर्धन पाटील, आ. अब्दुल सत्तार, माजी आ. एम. एम. शेख, कैलास गोरंट्याल, नामदेव पवार, नितीन पाटील, अशोक सायन्ना, जगन्नाथ काळे आदी या वेळी उपस्थित होते.

बिबट्यांसाठी वनविभाग सक्षम रिव्हॉल्व्हर घेऊन नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवर खा. चव्हाण यांनी टीका केली. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सक्षम असताना जेम्स बाँड पद्धतीने छायाचित्रे काढणार्‍या महाजनांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आरोग्य केंद्रातील  कर्मचार्‍यांची पदे तत्काळ भरण्याचे आदेश 

 औरंगाबाद जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यासह इतर पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून तत्काळ याची अंमलबजावणी के करण्यात यावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे   आरोग्य मंत्री  डॉ. सावंत यांनी  सभापती विलास भुमरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. औरंगाबाद  जिल्ह्यातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह इतर रिक्‍तपदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम  सभापती विलास भुमरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री  डॉ. दीपक सांवत यांच्याकडे निवेदनादारे केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची 12, आरोग्य सेवकांची 85 , आरोग्य सेविकांची 173 पदे, औषध निर्माता पाच पदे यासह रिक्‍त असल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. यापदाबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत जि. प. सदस्या मनीषा सोलाट यांनी रिक्‍तपदे भरण्याची मागणी केली होती. तसे पत्र मंत्र्यांना देण्यात आले आहे. डॉ. सावंत यांनी यास अनुकूल प्रतिसाद देत पदे भरण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत.