Mon, Jan 21, 2019 20:02होमपेज › Aurangabad › बीडीओ आणि अपंग संघटनेची परस्पर विरोधी तक्रारी 

बीडीओ आणि अपंग संघटनेची परस्पर विरोधी तक्रारी 

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 05 2018 3:37PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यात आज (सोमवार) दुपारी वादावादी झाली. अपंग कार्यकर्त्यास गटविकास अधिकारी आर. एम. राठोड यांनी मारहाण करून दालनाबाहेर काढल्याचा आरोप प्रहार संघटनेतर्फे करण्यात आला तर, कार्यकर्त्यांनी विनापरवानगी दालनात घुसून तोडफोड केल्याचे राठोड यांचे म्हणणे आहे. घटनेनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अपंगांच्या तीन टक्के निधी आणि शेतकऱ्यांचे विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वारंवार आंदोलन करण्यात येत आहे.  मात्र प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे 29 जानेवारीला  प्रहारतर्फे पंचायत समिती कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बीडीओनी संघटनेच्या अधिकाऱ्यांना या मागण्याची पूर्तता करण्याबाबत आश्वासन दिले होते. या आश्‍वासनांची पूर्तता केली की नाही याचा जाब विचारण्यासाठी प्रहारचे अपंग तालुकाध्यक्ष अमोल घुगे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर हे दोघे गटविकास अधिकारी आर एम राठोड यांच्याकडे गेले.

मात्र, बीडीओनी त्यांना विनापरवानगी दालनात कसे आलात असे म्हणत, कॉलर पकडून दालनाबाहेर काढले. यावेळी शिपायाने ही आपल्या कानशिलात मारली असा आरोप घुगे यांनी केला. मात्र राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावत घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात घुसून खुर्च्यांची तोडफोड करून, आपल्या अंगावर आल्याचा प्रत्यारोप केला.