Thu, Apr 25, 2019 18:44होमपेज › Aurangabad › आवाज रेकॉर्डिंगच्या संशयावरून विद्यार्थिनीचा मोबाइल हिसकावला

आवाज रेकॉर्डिंगच्या संशयावरून विद्यार्थिनीचा मोबाइल हिसकावला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

पीएच.डी.च्या कोर्सवर्कचे प्रमाणपत्र घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीने आपला आवाज मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याच्या संशयावरून तिचा मोबाइल इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गीता पाटील यांनी हिसकावल्याची घटना मंगळवारी (दि.28)  घडली. पाटील यांच्या तावडीतून आपला मोबाइल हिसकावून घेत त्या विद्यार्थिनीने बाहेर पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने याबाबत कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा इंग्रजी विभाग चर्चेत आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्र्वीच केवळ विद्यार्थिनीला का बोलला असे म्हणत एका येमेनमधील विद्यार्थ्याच्या पीएच.डी. कोर्सवर्कचा ए ग्रेड खोडून बी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (दि.28) पुन्हा विद्यार्थिनीने आपला आवाज रेकॉर्ड करत असल्याचा संशय आल्याने विभाग प्रमुखांनी तिचा मोबाइल हिसकावला. यामुळे संबंधित विद्यार्थिनी व विभाग प्रमुखांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने डॉ. पाटील यांच्या हातातील मोबाइल काढून घेत थेट कुलगुरूंचे दालन गाठले, परंतु कुलगुरू मिटिंगमध्ये व्यग्र असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज देऊन डॉ. पाटील विरुद्ध तक्रार केली आहे. या घटनेमुळे विभागात काही काळ गोंधळ उडाला होता. काय होतेय हे पाहण्यासाठी या वेळी इतर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.