Thu, Jun 27, 2019 11:48होमपेज › Aurangabad › राखरांगोळी...जुन्या शहराची अन् सलोख्याची

राखरांगोळी...जुन्या शहराची अन् सलोख्याची

Published On: May 13 2018 10:34AM | Last Updated: May 13 2018 10:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री उसळलेल्या जातीय हिंसाचारात जुन्या औरंगाबादबरोबरच एकप्रकारे शहरातील सामाजिक सलोख्याचीही  ‘राखरांगोळी’ झाली. या हिंसाचारात शेकडो वाहने, अनेक घरे, दुकाने आगीच्या  भक्ष्यस्थानी पडली. जुन्या शहरात जिकडे तिकडे दगडगोट्यांचे ढीग, राख, आग आणि धूरच दिसत होता. हिंसाचारात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार  नुकसानाचा हा  आकडा कोट्यवधींचा घरात आहे. 1992 साली घडलेल्या बाबरी मशीद दंगलीनंतर औरंगाबादकरांनी तब्बल 26  वर्षे जपलेला सामाजिक सलोखाही कालच्या घटनेने आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मोतीकारंजा व गांधीनगरातील दोन गटांमध्ये किरकोळ वादातून झालेल्या वादाच्या एका ठिणगीने शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहराला पेटविले. या वादानंतर हिंसक बनलेल्या दोन्ही गटांनी जुन्या शहरात अक्षरश: हैदोस घातला. गांधीनगरपासून पेटलेली ही ठिणगी जुना  मोंढा, राजाबाजार, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरा, गुलमंडीपर्यंत  पोहचली. जमावाने जुन्या शहरातील रस्त्यांवर उभी असलेली शेकडो दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने पेटवून दिली. जमाव केवळ येथेच थांबला नाही, तर जमावाने मुख्य शहागंज, राजाबाजार, संस्थान गणपती परिसर, सिटी चौक, मोंढा, नवाबपुरा या परिसरातील  अनेक घरे, दुकानेही पेटवून दिली. शहागंज येथे घराला लावण्यात आलेल्या अशाच एका आगीत अपंग वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला.

जितके तिकडे आग आणि धूर शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या या जाळपोळीमुळे जुन्या शहरात रात्रीनंतर शनिवारी सकाळपर्यंत जिकडे तिकडे आग आणि धुराचे लोट आकाशात दिसून येत होते. शहागंज  येथील जुने चप्पल मार्केट पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. येथील सर्व दुकाने जमावाने जाळून टाकली. सकाळी या भागांमध्ये भग्न अवस्थेतील दुकाने, घरे व तेथे पडलेली राख दिसून येत होती. या दंगलीत  जाळपोळ व दगडफेकीत झालेले नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. रस्त्यांवर दगडगोट्यांचे ढीग जुन्या शहरातील रस्त्यांवर सकाळी केवळ दगडगोट्यांचे ढीगच ढीग दिसून येत होते.  दगडफेकीसाठी जमावाला इतक्या मोठ्या प्रमाणात दगड सापडले तरी कसे? पूर्व नियोजित कट तर नाही ना?  असा संशय यामुळे येऊ लागला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर रस्त्यावर एक-एक  फूट दगडांचे थर पडलेले दिसून आले. 

तब्बल 26 वर्षांनंतर... 

औरंगाबादमध्ये तब्बल 26 वर्षांनंतर असा भीषण जातीय  तणाव निर्माण झाला. पूर्वी औरंगाबाद हे राज्यातील नव्हे तर देशातीलएक सर्वाधिक  संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात होते. देशात कोठेही काहीही झाले की त्याचे जातीय पडसाद औरंगाबादेत उमटतच होते. 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर औरंगाबादेत सर्वांत मोठी जातीय दंगल उसळली होती. त्या दंगलीतही अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले होते. त्यानंतर मात्र, ‘आता बस्स’ असा औरंगाबादकरांनी निश्‍चय केला आणि मग शहरात जातीय सलोख्याचे वातावरण निर्माण झाले.  औरंगाबादेत मधल्या काळात दंगली झाल्या. त्यात कानपूर प्रकरण, भीमा-कोरेगाव प्रकरण, कचरा प्रकरण या दंगलींचा समावेश होता. मात्र, या दंगली एक समाजविरुद्ध प्रशासन अशा होत्या. त्या दंगलींमुळे  सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचली नव्हती.