Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Aurangabad › आयोग, शासनाचा घोळ; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

आयोग, शासनाचा घोळ; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 8:39AMऔरंगाबाद : प्रताप अवचार 

सरकारी नोकरी मिळावी म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी शहरात येतात. ग्रंथालये व वाचनालयांत तासन्तास अभ्यास करून ते यशही  मिळवतात, परंतु लोकसेवा आयोगाबाबत शासनाचे अनिश्‍चित, अस्पष्ट धोरण असल्यामुळे चांगलाच घोळ होत आहे. वेळापत्रक जाहीर होते, मात्र ऐनवेळच्या निर्णयामुळे परीक्षाच रद्द होतात. त्यामुळे रात्रंदिवस डोळे फोडूनही विद्यार्थी निराशेच्या गर्तेत ओढले जात आहेत.  

सरकारी खात्यात नोकरी मिळविण्याच्या जिद्दीने औरंगाबाद शहरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. विविध जागांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहेत. यात अनेक विद्यार्थी यशही मिळवीत आहेत, परंतु ऐनवेळी परीक्षा रद्द करणे, त्याचा निकाल रखडणे किंवा त्या पदाची भरती न करणे असे निर्णय सरकार घेत असल्यामुळे वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी वाया जात आहे. यातच अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाते. परिणामी, बेरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

ना घर का, ना घाट का 
विद्यार्थी हजारो रुपये भरून, स्पर्धा परीक्षांची शिकवणी लावून तयारी करीत आहेत. मोठ्या उत्साहात ते वर्षभर परीक्षांची तयारीही करतात, परंतु नोकर्‍या उपलब्धतेची शाश्‍वतीच नसल्यामुळे वर्ष-दोन वर्षांत त्यांनी केलेले प्रयत्न, तयारी वाया जाते. त्यांनी ठरविलेल्या ध्येयाप्रमाणे वाटचाल करूनही, परीक्षांचा ताण, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पात्र उमेदवारांच्या संख्येमुळे व अपुर्‍या संधींमुळे यश पदरी पडत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी होते. 

संदिग्धता व अनिश्‍चितता 
राज्य लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी विविध पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच होत नाही. आयोगात असलेली संदिग्धता व अनिश्‍चितेचे परिणाम गंभीर आहेत. तीन वर्षांपासून आयोगाच्या माध्यमातून बोटांवर मोजण्याइतक्याच जागा निघाल्या आहेत. त्यातच किती व कोणत्या पदाच्या जागा निघणार, हे माहीत नसल्यामुळे दिशाहीन झालो आहोत. बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

- सचिन भुरे, विद्यार्थी 

अनेकांचे हे शेवटचे वर्ष 
सन-2019 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीतच शासनाच्या वतीने सरकारी नोकरभरती केली जाईल, अशी आशा आहे. अर्थात हे लाखो विद्यार्थ्यांचे परीक्षा देण्याचे शेवटचे वर्ष असणार आहे, परंतु तीन वर्षांपासून शासनाच्या धोरणामुळे त्रस्त आहोत.

- अंकुश तांगडे, विद्यार्थी