Wed, Jul 17, 2019 16:32होमपेज › Aurangabad › कारकून ते उपकुलसचिव व्हाया फसवणूक

कारकून ते उपकुलसचिव व्हाया फसवणूक

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 1:14AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्‍वरसिंग रायभान मंझा (51, रा. संतकृपा बंगला क्र. 50, इटखेडा) याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. तो पूर्वी आरोग्य विभागात कारकून होता. पाचोड रुग्णालयात त्याने नोकरीही केली. पुढे त्याने विद्यापीठात उपकुलसचिव पदापर्यंत मजल मारली. दरम्यान, त्याने नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले असून, फसवणुकीचा आकडा 60 लाखांच्या घरात गेला आहे. रविवारी न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.

एमएससीपर्यंतचे शिक्षण झालेला मंझा सध्या पीएच. डी. करीत आहे. विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात वादग्रस्त ठरलेला मंझा एकेकाळी शैक्षणिक वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणात बरेच दिवस निलंबित असलेल्या मंझाची पुन्हा विद्यापीठात ‘एन्ट्री’ झाली, परंतु त्याला उस्मानाबाद उपकेंद्रात नियुक्‍ती देऊन येथील वादग्रस्त प्रकरणांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण आता त्याच्याविरुद्ध थेट फसवणुकीचे गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. दोन गुन्ह्यांची नोंद झाली असून यात त्याने जवळपास 43 लाख रुपयांना पाच जणांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीही सुनावली. दरम्यान, दुसर्‍या गुन्ह्यात अटक करून रविवारी सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी त्याला न्यायालयात हजर     केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण मंझाची रवानगी हर्सूल कारागृहात केली. आरोपी ईश्‍वरसिंग मंझा याच्याविरुद्ध आठ ते दहा नागरिकांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करीत असून आतापर्यंत पाच जणांच्या तक्रारीवरून दोन गुन्ह्यांची नोंद झाली. यात जवळपास 43 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले. आणखी जवळपास 20 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशाने या प्रकरणातही गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्यामुळे मंझाला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. 

बुडत्याचे पाय खोलात
विद्यापीठाचा उपकुलसचिव हे मोठे पद आहे. जवळपास चारशे महाविद्यालयांचा कारभार येथून चालतो. कॉलेजवर बोलणी करून पद मॅनेजर करण्याचे काम त्याने सुरुवातीला केले. पुढे तो अशीच पदे मिळवून देऊ लागला. यात त्याला पैसे येत गेले, परंतु काही लोकांना नोकरी मिळवून देणे त्याला शक्य झाले नाही. नेमकी हीच बाब त्याच्या अंगलट आली. तसेच, त्याने खिरापत वाटल्यागत लोकांना धनादेश देऊन ठेवले. हा सर्व प्रकार त्याला अडचणीचा ठरत गेला.