Sun, Jul 21, 2019 06:24होमपेज › Aurangabad › शहर पूर्वपदावर

शहर पूर्वपदावर

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत झालेल्या दंगलीनंतर जुन्या औरंगाबादेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रविवारी अनेक ठिकाणच्या बाजारपेठाही बंद होत्या. सोमवारी (दि. 14) शहर हळूहळू पूर्वपदावर आले. दंगलीचा केंद्रबिंदू असलेला राजाबाजार ते नवाबपुरा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच जिन्सी भागातील नागरिकांची या रस्त्यावरील वर्दळ जाणवली. मात्र, खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त कायम होता. विविध चौकांत शस्त्रधारी पोलिस तैनात होते.

सिटी चौकाकडून शहागंजमध्ये आल्यावर दंगलीत झालेल्या नुकसानाचा अंदाज येतो. शहागंज चौकातील संपूर्ण बाजारपेठ, संस्थान गणपती चौकातून (राजाबाजार) जिन्सीकडे जाणार्‍या रस्त्यावरील मुख्य बाजारपेठ खाक झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेली दंगल शनिवारी पहाटेपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शनिवारी या भागात प्रचंड तणाव होता. रविवारी शांततापूर्ण तणाव होता. रस्त्यावरून फिरण्यास सर्वांना बंदी घातली होती. नवाबपुरा चौकात पोलिसांनी रस्ता बंद के होता. तसेच राजाबाजारमध्येही काही भागात लाकडांचे दुभाजक लावून पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली होती. सोमवारी मात्र, रस्त्यावरील सर्व काचा, लाकडे उचलून बाजूला करण्यात आली. त्यानंतर या रस्त्यावरून पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू झाली. अनेक दुचाकीस्वार कुटुंबासह येथून जाताना नजरेस पडले. अनेक महिला, तरुणीही घराबाहेर पडल्या. या भागातील व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. 

5 कोटी 70 लाखांचे नुकसान

दंगलीत झालेल्या जाळपोळ, तोडफोडीत सिटी चौक ठाण्याच्या हद्दीतील जवळपास 61 दुकाने खाक झाली. त्यात पाच कोटी 70 लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या दुकानांचे पंचनामे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघ, हवालदार सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, सय्यद अश्रफ, नवाब शेख, दत्ता गढेकर यांच्या पथकाने केले आहेत. याशिवाय जिन्सी आणि क्रांती चौक हद्दीतील दुकानांचेही नुकसान झाले आहे. मात्र, तेथील नुकसानाचा आकडा कमी आहे. सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी त्या भागातील पंचनामे केले आहेत. 

संशयितांची धरपकड सुरूच : आयुक्‍त

दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सीसीटीव्ही तपासून त्यांनी आरोपींची धरपकड सुरू केली असून संख्या वाढणार आहे. जवळपास तीन ते चार संशयितांना सोमवारी ताब्यात घेतले. यात मोठ्या पदाधिकार्‍याचा समावेश नसला तरी मंगळवारपासून या कारवाईला वेग येईल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी दिली.