Fri, Jul 19, 2019 22:33होमपेज › Aurangabad › मुलाचा खून : आई, मावशीसह तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी

मुलाचा खून : आईला पोलिस कोठडी

Published On: Sep 07 2018 12:54AM | Last Updated: Sep 07 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व मुलाची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, मावशी खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड आणि मावस बहीण सुनीता राजू साळवे यांना गुरुवारपर्यंत  पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. 

मृत राहुल दिलीप बनसोडे (28) याचा दोरीने गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व त्याची आई कमलाबाई दिलीप बनसोडे (45, रा. आंबेडकरनगर) हिनेच 15 एप्रिल 2018 ला राहुल घराबाहेर निघून गेला आणि परत न आल्याची तक्रार दिली होती. त्यावरून सिडको ठाण्यात ‘मिसिंग’चा गुन्हा दाखल झाला होता. 18 एप्रिलला जाधववाडी परिसरातील विहिरीत राहुलचा मृतदेह आढळला.  शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान, राहुलला दारूचे व्यसन होते व तो त्याच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते, असे राहुलच्या पत्नीने तपासात सांगितले. 15 एप्रिलला राहुल, त्याची आई, मावशी खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड, मावस बहीण सुनीता राजू साळवे (30, सर्व रा. आंबेडकरनगर) हे घरात असताना, चिकन का केले नाही म्हणून राहुलने त्याच्या आईला अश्‍लील शिवीगाळ केली होती आणि त्याचवेळी ‘थांब, तुझा काटा काढते’ असे त्याची आई म्हणाली होती. त्यानंतर राहुल दारू पिऊन पडला असता, त्याच्या आईने त्याचे हात-पाय ब्लाऊजने बांधले, तसेच मावशी व मावस बहिणीने त्याला मारहाण करीत आईने राहुलचा दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह रिक्षातून नेऊन विहिरीत फेकून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वरील तिघांसह रिक्षाचालक इंद्रजित हरिसिंग निकाळजे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन वरील तिघांना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींनी ज्या ब्लाऊज, रुमालाने राहुलचे हात-पाय बांधले व ज्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला, ते जप्त करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील जप्त करायची आहे. खुनाचा नेमका उद्देश काय, याचाही तपास करायचे आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिघांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.