Thu, Jul 18, 2019 21:55होमपेज › Aurangabad › रसायन तंत्रज्ञान उपकेंद्रासाठी ४०० कोटी मंजूर

रसायन तंत्रज्ञान उपकेंद्रासाठी ४०० कोटी मंजूर

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यातील सिरसगाव (जि. जालना) येथे उपकेंद्र उभारण्यात येणार असून यासाठीच्या 396 कोटी 69 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्प प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने यापूर्वीच या संस्थेला एलिट स्टेट्सचा दर्जा दिलेला आहे. 

रसायन तंत्रज्ञान संस्थेला सिरसगाव येथे उपकेंद्र उभारण्यासाठी 200 एकर शासकीय जमीन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून तेथे तीन वर्षांत उपकेंद्र सुरू करणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील नागरी जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करू शकणारे 30 सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करून संबंधित क्षेत्रात उच्च दर्जाचे संशोधन करण्याचा संस्थेचा मानस आहे.

त्याचबरोबर संस्थेला तेथे रसायन तंत्रज्ञानासह, औषधनिर्माणशास्त्र, अन्न, तेल, पॉलिमर्स अ‍ॅण्ड मटेरिअल्स या क्षेत्रात 1560 विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, असे अभ्यासक्रम सुरू करावयाचे आहेत. त्यासाठी 121 शिक्षकांची आणि 158 शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदनिर्मिती करणे, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, कार्यशाळा, आरेखन शाळा, ग्रंथालय, वसतिगृहे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची निवासस्थाने, अतिथीगृहे बांधण्यासह 200 एकर जागेला कुंपण करण्याची गरज आहे. 

पदभरती आणि बांधकामे आदी कामांसाठी संस्थेने 396 कोटी 69 लाख रुपये खर्चाचा प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तथापि, शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या निर्मितीस उच्चस्तर समितीच्या छाननीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली. याशिवाय 40 कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती खर्चावरही शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

गरज, उपलब्धतेनुसार मिळणार निधी : रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी राज्य शासन 2018-19 पासून निधीची उपलब्धता आणि कामाची प्रगती यानुसार टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देणार आहे. प्रकल्प प्रस्तावातील भांडवली खर्चापोटीच्या 202 कोटी 90 लाख रुपये एवढ्या अपेक्षित खर्चापैकी राज्य शासन टप्प्याटप्प्याने 100 कोटी रुपये देणार असून उर्वरित निधी संस्थेने उभारावा, असे बैठकीत ठरले.