Sat, Aug 17, 2019 16:50होमपेज › Aurangabad › लग्‍नाचा वाद; चार्ली पथकातील पोलिसाने घेतले पेटवून 

लग्‍नाचा वाद; चार्ली पथकातील पोलिसाने घेतले पेटवून 

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

अवघ्या 20 दिवसांवर लग्‍न येऊन ठेपलेल्या चार्ली पोलिसाने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. लग्‍न जमलेल्या मुलीशी वाद झाल्यावर त्याने लग्‍नाला नकार दिला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत लग्‍न कर, अन्यथा अब्रुनुकसानाचा 25 लाखांचा दावा करू, अशी धमकी मुलीकडच्यांनी दिल्यामुळे त्याने सोमवारी सकाळी 9 वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो 95 टक्के भाजला असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. 

अनिल अशोक घुले (25, बक्‍कल क्र. 1887, रा. मयूर पार्क) असे चार्ली पोलिसाचे नाव आहे. लग्‍नावरून वाद सुरू असल्याने अनिल तीन दिवसांपासून सुटीवर होता. आता त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. 
याबाबत पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार्ली पथकातील अनिल घुले हा 2014 मध्ये पोलिस दलात भरती झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो हर्सूल ठाण्याशी संलग्न होता. मात्र, आता सगळेच चार्ली मुख्यालयाशी संलग्‍न आहेत. बदनापूर येथील रोहिणी (नाव बदललेले आहे) हिच्याशी अनिलचे लग्न ठरले होते. साखरपुडा झाल्यावर 1 एप्रिल रोजी लग्‍न ठरविण्यात आले, परंतु अनिल आणि रोहिणीत किरकोळ कारणावरून वाद झाला.

त्यामुळे अनिलने लग्‍नाला नकार दिला. यात दोन्ही कुटुंबांत वितुष्ट आले. लग्‍नाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी रात्री दोन्ही कुटुंबांची बैठक झाली. या बैठकीत रोहिणीच्या कुटुंबीयांनी अनिलला लग्‍न करा, अन्यथा तुमच्यावर 25 लाखांच्या अब्रुनुकसानाचा दावा करू, असे धमकावले. त्यामुळे अनिल तणावात होता. सोमवारी सकाळी त्याच्या आईने लग्‍न करून घे असे सांगितले. मात्र, नेमके काय करावे हे त्याला सुचत नव्हते. भाऊ शुभम घराबाहेर गेल्यावर आई आणि बहीण घरात असताना अनिल आंघोळीचा मग बाहेर घेऊन आला. दुचाकीतून पेट्रोल काढून घरात गेला. तेच पेट्रोल अंगावर ओतून घेत त्याने पेटवून घेतले. पेट्रोलमुळे काही क्षणात आग भडकली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या अनिलच्या अंगाची लाहीलाही झाल्यावर तो जोरजोरात ओरडला. त्यानंतर परिसरातील नागरिकांसह आई व बहिणीने त्याच्याकडे धाव घेतली. आई व बहीण अंगावर पाणी टाकण्यासाठी बाहेर येईपर्यंत तो जवळपास 95 टक्के भाजला. नागरिकांनी त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकत आग आटोक्यात आणली.