Mon, Apr 22, 2019 12:35होमपेज › Aurangabad › खैरेंना बदला!

खैरेंना बदला!

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:54AMकन्नडः प्रतिनिधी

स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना संपवायला मागेपुढे पाहत नाहीत. आतापर्यंत त्यांनी कोठेही सामंजस्यपणा न घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून स्वतःच्या फायद्यासाठी ते पक्षाला वेठीस धरतात, असा आरोप करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खैरे ऐवजी शिवसेनेने नवीन चेहर्‍याला संधी द्यावी, नसता पक्षाचे मोठे नुकसान होईल, असा इशारा आमदार हर्षवर्धन जाधव यांंनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. या संदर्भातील एक पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात माझे खच्चीकरण व्हावे म्हणून खासदार खैरे यांनी मला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व बाजार समिती निवडणुकती एकही उमेदवार मिळू दिला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव मला विकास महर्षी रायभानजी जाधव विकास आघाडी स्थापन करावी लागली. नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या माझ्या आघाडीच्या उमेदवाराला 6 हजार तर शिवसेनेच्या उमेदवाराला अवघी दीड हजार मते मिळाली. नगरपालिकेत आघाडीचे 4 तर शिवसेनेचे दोन  सदस्य निवडून आले. बाजार समितीत खा. खैरेंनी दिलेल्या उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली तर बाजार समिती सध्या आघाडीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत कन्नड, सोयगाव विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकूण 45 हजार तर शिवसेनेच्या  उमेदवारांना 32 हजार मते मिळाली.

दोघांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर शिवसेनेच्या उमेदवारांना एकूण 77 हजार मते मिळाली असती. एवढेच नाही तर यामुळे जिल्हा परिषदेवर शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय सत्ता मिळवता आली असती, अशी आठवण आमदार जाधव यांनी यावेळी करून दिली. कन्नड पंचायत समितीतही आघाडीचे 5 तर शिवसेनेचे 3 सदस्य आहेत. ही निवडणूक एकत्र लढवली असती तर पंचायत समितीवर भगवा फडकला असता असे सांगत खासदार खैरे स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी वेळप्रसंगी शिवसेना संपवायला मागे पुढे बघत नाहीत, हा यापूर्वीचा इतिहास सांगतो. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा, अशी सर्वसामान्यांची तीव्र इच्छा आहे. मात्र उमेदवारी देताना पक्षाने नवीन चेहरा द्यावा, ही रास्त अपेक्षा आहे. उमेदवार न बदल्यास पक्षाला निवडणुकीत धोका होऊ शकतो, असेही मी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याचे आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले.

Tags : Aurangabad, Change, Khaire