Thu, Jun 20, 2019 01:13होमपेज › Aurangabad › केंद्रीय पथकाला कचर्‍यातही दिसली स्वच्छता; सर्वेक्षणात औरंगाबाद १२८ वे

केंद्रीय पथकाला कचर्‍यातही दिसली स्वच्छता; सर्वेक्षणात औरंगाबाद १२८ वे

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 24 2018 1:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद शहर हे अभूतपूर्व अशा कचराकोंडीचा सामना करीत आहे. नागरिकांना अक्षरश: नाक मुठीत धरून जगावे लागत आहेत. अशा या भीषण परिस्थितीतही यावर्षी औरंगाबाद शहर स्वच्छतेच्या बाबतीत चांगलीच ‘पत’ वाढली. देशपातळीवरील स्वच्छतेच्या सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने बढती मिळवत चक्‍क 128 वा क्रमांक गाठला. विशेष म्हणजे गतवर्षी जेव्हा कचराकोंडी नव्हती त्यावेळी शहराचा क्रमांक 299 होता. कचराकोंडीमुळे हा क्रमांक पार तळाला जाईल, अशी भीती प्रशासनाला वाटत असतानाच पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला कचर्‍यात स्वच्छता दिसली, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल!

केंद्र शासनाने 2014 सालापासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षांपासून देशपातळीवर स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदा या सर्वेक्षणात देशभरातील 4 हजार 41 शहरे सहभागी झाली होती. त्यात स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या औरंगाबाद शहराचाही सहभाग होता. गतवर्षी औरंगाबाद शहराचा या सर्वेक्षणात देशात 299 वा क्रमांक आला होता. यंदा तरी आपली पत सुधारावी म्हणून म्हणून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन गेल्या आठ महिन्यांपासून प्रयत्नशील होते. हे प्रयत्न सुरू असतानाच 16 फेब्रुवारीपासून नारेगाव, मांडकीतील नागरिकांनी आंदोलन करीत मनपाचा नारेगाव येथील कचराडेपो कायमचा बंद पडला. त्यानंतर शहरात अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झालेली आहे. अद्याप मनपाला कचरा टाकण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मशिनरी मिळालेली नाही. त्यामुळे शहरात फेब्रुवारी महिन्यापासूनच रस्त्यारस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये कचर्‍याचे ढीगच ढीग साचलेले आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. 

कचराकोंडीतच झाली होती पाहणी

ही कचराकोंडी सुरू असतानाच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे स्वच्छतेची पाहणी करणारे पथक शहरात धडकले. या पथकाने दोन दिवस शहरातील स्वच्छतेची अवस्था, कचर्‍याची विल्हेवाट याची पाहणी केली होती. हे पथक शहरात स्वच्छतेची पाहणी करत फिरत असताना जागोजागी शेकडो टन कचरा पडलेला होता. अक्षरश: संपूर्ण शहराचीच कचराकुंडी झालेली होती. त्यामुळे सर्वेक्षणात शहराचे स्थान खूपच खालावेल, अशी भीती व्यक्‍त होत होती. केंद्रीय शहरे आणि गृह विभागाने या सर्वेक्षणातील पहिल्या दहा बक्षीसपात्र शहरांची यादी पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आज पहिल्या पाचशे शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी पाहून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनालाही धक्‍काच बसला. कारण यादीत स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबाद शहराला चक्‍क 128 व्या क्रमांक मिळाला. गतवर्षी या सर्वेक्षणात औरंगाबाद शहर 299 व्या क्रमांकावर होते. अशा या अभूतपूर्व कचरा कोंडीत तब्बल 171 क्रमांकाची बढती मिळाल्याने सर्वच जण बुचकळ्यात पडले आहेत.