Tue, Oct 22, 2019 02:47होमपेज › Aurangabad › नोकरीच्या आमिषाने तरुणीला ढकलले वेश्या व्यवसायात!

नोकरीच्या आमिषाने तरुणीला ढकलले वेश्या व्यवसायात!

Published On: Feb 23 2018 10:18AM | Last Updated: Feb 23 2018 10:18AM 

औरंगाबाद : प्रतिनिधी

नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगड येथून औरंगाबादेत आणलेल्या 20 वर्षीय तरुणीला पुंडलिकनगरमध्ये डांबून ठेवत तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले. पीडितेने तरुणांच्या ताब्यातून सुटका करून घेतल्यानंतर गुरुवारी (दि. 22) हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात पीटा अ‍ॅक्ट आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली.

विकास हुमने (रा. पुंडलिकनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून या प्रकरणी दिवाकर मेश्राम, त्याची पत्नी (विलासपूर, छत्तीसगड), अन्नू (दलाल) आणि अमन या पाच जणांसह विविध हॉटेलवर तरुणीकडे ग्राहक म्हणून आलेल्या सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे अधिक तपास करीत आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या विलासपूर जिल्ह्यातील 20 वर्षीय पीडिता आईसोबत ओळखीच्या दिवाकर मेश्राम याच्या घरी गेली. तेथे अन्नू नावाची महिला भेटली. मेश्राम व त्याच्या पत्नीने त्यांची ओळख करून दिली. तसेच, अन्नू महाराष्ट्रात एनजीओ चालविते. तिने अनेकांना नोकरीला लावले आहे. तुलाही नोकरी मिळवून देईल, असे आमिष त्यांनी पीडितेला दाखविले. त्यानंतर पीडिता अन्नूसोबत औरंगाबादेत यायला तयार झाली.    

16 फेब्रुवारीला त्या दोघी छत्तीसगड येथून औरंगाबादला निघाल्या. 17 फेब्रुवारीला येथे पोहोचल्या. रिक्षाने पुंडलिकनगरातील खोलीपर्यंत गेल्या. तेथे आरोपी अमन आणि विकास आधीपासूनच झोपलेले होते. ते नातेवाईक असल्याची खोटी माहिती अन्नूने पीडितेला दिली. तसेच, काही वेळानंतर दोन दिवस तिला येथेच राहावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर अन्नू तेथून निघून गेली. त्यानंतर लगेचच अमन आणि विकास यांनी पीडितेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.

नागरिकांच्या मदतीने करून घेतली सुटका
22 फेब्रुवारी रोजी आरोपी अमन आणि विकास यांनी पीडितेला पुंडलिकनगरमधील खोलीत मारहाण केली. त्यानंतर अमन बाहेर तर विकास बाथरूमला गेला. ही संधी साधून पीडितेने बाहेर येऊन नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी पीडिता आणि विकास यांना पुंडलिकनगर ठाण्यात आणले. सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड, उपनिरीक्षक रामचंद्र पवार, अनिता फासाटे यांनी पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा नोंद केला. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. 

हॉटेलच्या खोलीत कोंडले
आरोपी विकास, अमन आणि अन्नू यांनी पीडितेला शहरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन खोलीत कोंडले. स्वतः दुसर्‍या खोलीत थांबले आणि आठ ते दहा ग्राहकांना बोलावून पीडितेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे. रात्री हॉटेलात आणि दिवसा पुंडलिकनगरमधील खोलीत तिला कोंडून ठेवले जायचे.  
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19