Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Aurangabad › महिन्याची थकबाकी; अन् वीज गुल

महिन्याची थकबाकी; अन् वीज गुल

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 12:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आठ दिवसांपासून एक हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरण राबवत आहे. यात अनेकांचे चालू महिन्यासहित दोन महिन्यांचे बिल एक हजारापेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिक संताप व्यक्‍त करत आहेत.

एक फेब्रुवारीपासून महावितरणने थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला पाच हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या ग्राहकांची थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. आठ दिवसांपासून मात्र एक हजारापेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या ग्राहकांची थकबाकी वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अनेेेक ग्राहक नियमित वीजबिल भरणारे आहेत, परंतु मागील महिना व चालू बिलांची रक्‍कम एक हजारापेक्षा जास्त असणार्‍या अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऐन उन्हाचा कडाका आणि परीक्षेच्या काळात ही कारवाई करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. फक्‍त एक महिन्याची थकबाकी असेल तर महावितरणने ग्राहकांसाठी थोडा वेळ द्यावा किंवा तशी माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.या संबंधात महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.