Sat, Mar 23, 2019 16:38होमपेज › Aurangabad › रुग्णांची सेवा करण्यात मोठा आनंद : मुख्यमंत्री 

रुग्णांची सेवा करण्यात मोठा आनंद : मुख्यमंत्री 

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 10 2017 1:05AM

बुकमार्क करा

लासूर स्टेशन : प्रतिनिधी 

स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील प्रत्येक घरांत शौचालय झाले पाहिजे, यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. रोगराई दूर व्हावी, यासाठी ही योजना असून नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे. राज्यातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जो आनंद होत नाही, त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त आनंद रुग्णांची सेवा केल्यानंतर होतो, असे उद‍्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.     

लासूर स्टेशन येथील मार्केट यार्डा समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात शेकडो तज्ज्ञ डॉक्टरांकडून लाखो रुग्णांची तपासणी करण्यात आली. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, शिबिराचे आयोजक आमदार प्रशांत बंब, वेरूळचे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, आ. विनायकराव मेटे, आ. अतुल सावे, आ. संजय सिरसाट, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, संजय खंबायते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले, राज्य शासन स्वच्छ भारत अभियान, घर तेथे शौचालय अशा आजार दूर करणार्‍या योजना राबवत आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आजार होऊ नये याची काळजी शासन घेत आहे, तसेच आजार झाल्यावर उपचार मिळावेत, यासाठीही पुढाकार घेतला जात आहे. शासन आपल्या पाठीशी असून कोणताही आजार असो रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी लागेल तितका पैसा सरकार खर्च करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

शिबिरात सहा कक्ष व 90 ओपीडीची उभारणी 
मुख्य कार्यक्रमस्थळासह सहा प्रकारचे भव्य कक्ष उभारण्यात आले होते. रुग्णांच्या तपासणीसाठी 90 प्रकारचे बाह्यरुग्ण कक्ष अर्थात ओपीडी विभाग तयार करण्यात आले. या महाशिबीर स्थळाच्या प्रवेशद्वाराला श्री देवी दाक्षायणी प्रवेशद्वार असे तर  मुख्य समारंभ स्थळाला पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह असे नामकरण करण्यात आले. या सर्व कक्षामध्ये नेत्र, दंत आणि कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया, स्त्री रुग्ण, मूत्रविकार, अस्थिरुग्ण, प्लास्टिक सर्जरी, बीएमडी, बालरुग्ण, किडनी, हृदयरोग, हृदय शस्त्रक्रिया, जनरल मेडिसन, छाती व क्षयरोग, नाक-कान-घसा, त्वचा रोग असे विविध विभाग कक्ष आहेत, तसेच सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी तपासण्यांची सुविधा करण्यात आली आहे.

औषधी व पॅथॉलॉजीची सुविधा 
सर्व औषध भांडारात दाखल होणार्‍या औषधांची नोंदणी तातडीने संगणकांवर करून ती त्या-त्या ओपीडीवर उपलब्ध करून देण्यासाठी व प्रत्येक ओपीडीवरील औषधी वितरणासाठी जवळ जवळ 90 केमिस्ट बांधवांचे पथक सज्ज आहे. शहरात पाच ट्रक औषधी दाखल दाखल झाल्या आहेत.

नेत्रदान, अवयवदान संकल्प 
याच ठिकाणी नेत्रदान व अवयवदानाची इच्छा असणार्‍या व्यक्तींना फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, तसेच शस्त्रक्रियांसाठी 2 हजार रक्तदात्यांच्या रक्तसंकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी 10 रुग्णवाहिकांसह विविध प्रकारच्या वाहनांची सज्जता तसेच अग्नीशामनदलाचे बंब व पाच फिरते शौचालये ठेवण्यात आले होते. 
 
कचरा विल्हेवाट व्यवस्था 
संपूर्ण शिबिरस्थळाची स्वच्छता करण्यासाठी जवळ-जवळ 500 ते 700  कार्यकर्ते तसेच महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी सज्ज ठेवण्यात आले होते. 
शिबिरस्थळ असणार्‍या मार्केट यार्डा समोरील गीताबन परिसराला यात्रेचे स्वरूप आल्याचेही पाहावयास मिळाले.

या महाआरोग्य शिबिरात 1 हजार 550 डॉक्टरांनी एक लाख 30 हजार रुग्णांची तपासणी केली. नियोजन करण्यासाठी 1000 ते 1500 कार्यकर्ते, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून हजेरी लावली.