Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Aurangabad › सिडको नाट्यगृह खासगीकरणाच्या हालचाली

सिडको नाट्यगृह खासगीकरणाच्या हालचाली

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 1:49AM

बुकमार्क करा


औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील सिडको भागातील संत तुकाराम महाराज नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली पालिकेतील पदाधिकार्‍यांनी सुरू केल्या आहेत. पालिकेच्या सभागृहाने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव आधीच मंजूर केलेला आहे. महापौरांनी शनिवारी या नाट्यगृहाच्या खासगीकरणाची संचिका तत्काळ मार्गी लावण्याची सूचना अधिकार्‍यांना केली.

सिडको प्रशासनाकडून 2010 साली सिडको एन-5 मधील भव्य नाट्यगृह मनपाकडे हस्तांतरित झाले. त्यानंतर पालिकेने नाट्यगृहाचे संत तुकाराम महाराज नाट्यगृह असे नामकरण केले, परंतु पालिकेला आता हे नाट्यगृह सांभाळणे जड झाले आहे. पालिकेकडून त्याची नियमित देखभाल दुरुस्तीही होत नसल्याचे त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मागील काही कालावधीपासूनच पालिकेतील सत्ताधारी या नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याबाबतचा प्रस्तावही पालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली. नाट्यगृहाची देखरेख व स्वच्छतेसाठी येथे पालिका प्रशासनाकडून अकरा कर्मचारी येथे नियुक्‍त केलेले आहेत. एवढे कर्मचारी असतानाही नाट्यगृहात अस्वच्छता कशी? असा सवाल यावेळी महापौर घोडेले यांनी अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना केला. तसेच या कर्मचार्‍यांना तातडीने वॉर्ड कार्यालयाशी जोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी महापौरांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना बोलावून सिडको नाट्यगृहाच्या खासगीकरणाची संचिका तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. खासगीकरणानंतरच सिडको नाट्यगृहाची अवस्था सुधारेल, असे मत घोडेले यांनी व्यक्‍त केले.