Sun, Feb 24, 2019 01:14होमपेज › Aurangabad › बुवाबाजीने घेतला महिलेचा बळी

बुवाबाजीने घेतला महिलेचा बळी

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

महिलेवर उपचार करावे लागतील असे सांगून लाखो रुपये उकळून भोंदूबाबाने अत्याचार केला. यामुळे महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी भोंदूबाबावर गुन्हा दाखल केल्याशिवाय महिलेचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने घाटीत तणाव निर्माण झाला होता. सोनी रवींद्र चावरिया (28, रा. दलालवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी चावरिया यांना दहा वर्षांपूर्वी डोकेदुखीचा आजार जडला होता. त्यातच डोके दुखू लागले की त्यांच्या छातीत चमका निघत असत. नातेवाइकांनी त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार केले. मात्र, आजार ठीक होत नव्हता. त्यामुळे काही जणांच्या सल्ल्यावरून राणी यांना पैठण येथे राहत असलेल्या भोंदूबाबा राजेश कत्तारसिंग डुगलज यांच्याकडे उपचारासाठी नेले.

राजेश डुगलजने तिच्यावर गेल्या आठ-नऊ वर्षांत उपचार करताना तिच्याशी गोड बोलून सुमारे 15 ते 16 लाख रुपये उकळले. राणी चावरिया यांना आता बरे वाटू लागल्याने त्या 30 जुलै रोजी डुगलजच्या पॉवर हाऊस, पैठण येथील घरी पैसे मागण्यासाठी गेल्या. यावेळी डुगलजने तिला पैसे न देता तिची छेड काढून अत्याचार केल्याने त्या महिलेने घरातच विष प्राशन केले. तेव्हापासून तिच्यावर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

जबाब चुकीचा नोंदविला

महिलेवर उपचार सुरू असताना पैठण पोलिस ठाण्याचे कर्मचारी ती शुद्धीवर आल्यानंतर जबाब घेण्यासाठी घाटीत आले होते. या वेळी महिलेने पोलिसांना डुगलजने तिच्याकडून पैसे घेतले व ते न देता अत्याचार केला, त्यामुळे आपण विष घेतले असा जबाब दिला असल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल न करता विनयभंग केल्याचा आरोप दाखल केला आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री पावणे एक वाजता मृत्यू झाल्यानंतर घाटी चौकीतील पोलिसांनी पैठण पोलिसांना कळविले.  नातेवाईक राजेश डुगलज या भोंदूबाबावर अत्याचार व मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हणत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावर पैठण पोलिसांनी उपनिरीक्षकांना पाठवितो असे सांगितले. मात्र, हे अधिकारी दुपारपर्यंत घाटीत न आल्याने मृत महिलेचे नातेवाईक संतापले होते. हे अधिकारी आल्यानंतर नातेवाइकांचा पवित्रा पाहून त्यांनी वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी पैठण ठाण्यात गेले. त्यामुळे महिलेचा मृतदेह हा घाटी शवागृहातच होता.