Tue, Apr 23, 2019 13:44होमपेज › Aurangabad › घरफोडी करणारी ‘खिडकी गँग’ जेरबंद

घरफोडी करणारी ‘खिडकी गँग’ जेरबंद

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 1:59AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये घरफोड्या करून पोलिसांच्या नाकीनऊ आणणार्‍या ‘खिडकी गँग’च्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले. वाळूज रस्त्यावर वाहनातून आठ कि. मी. पाठलाग करून सहा जणांच्या टोळीतील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. मध्यरात्रीनंतर कंपाउंडमध्ये घुसायचे आणि घरातील सदस्य पहाटेच्या साखर झोपेत असताना खिडकी उचकटून डल्ला मारायचा, अशी या टोळीची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. 

सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (35, रा. मोमिनपुरा, बीड, ह. मु. हर्सूल), सय्यद सिराज सय्यद लियाकत (32, रा. बीड, ह. मु. एमआयडीसी, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान (31, रा. एमआयडीसी, अहमदनगर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून लोखंडी कटवणी, दोन मोठे स्क्रू-ड्रायव्हर, दोन बॅटर्‍या आणि कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांचे पथक 30 नोव्हेंबर रोजी वाळूज भागात गस्त घालित होते. त्यावेळी रात्री 9 वाजता कार (क्र. एमएच 16, एजे 2487) मधून काही आरोपी जात असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक जारवाल, हवादलार शिवाजी झिने, पोलिस नाईक विलास वाघ, राजेंद्र साळुंके, कॉन्स्टेबल प्रभाकर राऊत, विशाल सोनवणे, रवी दाभाडे, गजानन मांटे, सुनील धात्रक यांच्या पथकाने सापळा रचला. संशयित कार येताच पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. 

सहा घरफोडींची कबुली

एन-4 भागातील रहिवासी व्यापारी संजय दराडे यांच्या घरात या आरोपींनी 16 नोव्हेंबर रोजी चोरी केली होती. पहाटे सहा वाजता त्यांनी हात साफ केला होता. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याशिवाय एन-3, एन-1 आणि जिन्सी भागांतील आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.  

जेलमध्येच जुळली मैत्री

सय्यद सिकंदर हा बीड, नगरमध्ये वॉन्टेड असून जळगावात दीड वषर्र्े कारागृहात होता. सय्यद सिराज हा सहा महिने नगरच्या कारागृहात होता. तोही बीड, नगर पोलिसांसाठी वॉन्टेड आहे, तर शेख बबलू हा नगरमध्ये दोन वर्षे कारागृहात होता. जेलमध्येच त्यांची मैत्री जुळली. बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा घरफोडीचा उद्योग सुरू केला.